मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी बेभरवश्याच्या पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आता उपलब्ध जलस्त्रोत अधिक काळजीपूर्वक वापरले तरच निभाव लागण्याची शक्यता आहे. याच उद्देशाने झरे बांधणीचा एक प्रकल्प ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात राबविला जात आहे. थेंबे थेंबे झरा साचे असे या कामाचे स्वरुप असून त्यामुळे प्रदेशातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
पावसाळ्यानंतर साधारणपणे पुढील दोन-अडीच महिने पाणी डोंगर उतारावरुन नाल्यांच्या स्वरुपात वाहत असते. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत हे झरे जिवंत असतात. या झऱ्यांना छोटे बांध घालून त्याचे पाणी अडविले, तर मार्च महिन्यापर्यंत झरा जिवंत राहतो आणि स्थानिकांना त्यातून पाणी मिळू शकते.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून असे अनेक झरे उताराच्या दिशेने वाहत असतात. जल व्यवस्थापन तज्ञ विलास पारावे यांनी रायगड, रत्नागिरी तसेच ठाणे जिल्ह्यात विविध स्वयंसेवी संस्था आणि कंपन्यांच्या माध्यमातून असे तब्बल १७० झरे बांधणी प्रकल्प उभारले आहेत. तूर्त स्थानिक जनता आणि त्यांच्या जनावरांची तहान या छोट्या झऱ्यांच्या पाण्यातून भागविता येईल, असा विचार या प्रकल्पांच्या उभारणीमागे आहे.
या योजनेला झऱ्याचे तोंड बांधणे असेही म्हणतात. दोन ते तीन फुट उंचीची भिंत उभारुन झऱ्याचे पाणी अडविले जाते. त्यामुळे त्याचे आयुष्य दीड ते दोन महिन्यांनी वाढते. मग एरवी जानेवारी महिन्यात आटणारा झरा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाझरतो. त्याचा दुसरा फायदा म्हणजे आसपासच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढते.
पेट्रोकेमिकलमधे इंजिनीअरींग केलेले विलास पारावे सुरुवातीची सहा वर्षे नोकरी केल्यानंतर आता गेली अकरा वर्ष पूर्णवेळ जलव्यवस्थापन तज्ञ म्हणून काम करत आहेत. युटीव्हीसोबत त्यांनी सुरुवातीस रायगड जिल्ह्यात काम केले. २००८ मध्ये ब्रिज संस्थेसोबत त्यांनी काही प्रकल्प साकारले .आता ते स्वतंत्रपणे काम पाहतात.
एका झऱ्याचे तोंड बांधण्यासाठी साधारण तीस हजार रुपये खर्च येतो आणि साधारण २० वर्षे या योजनेतून खात्रीपूर्वक पाणी मिळू शकते, असे श्री. पारावे सांगतात. बांध घालून पाणी अडविलेल्या एका झऱ्यापासून एका गावाला अथवा पाड्याला मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी खात्रीपूर्वक पाणी मिळू शकते.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात २२ तर जव्हार आणि मोखाडा तालुक्यात प्रत्येकी दोन झरे प्रकल्प साकारण्यात आले आहेत. काही कॉर्पोरेट कंपन्या प्रायोजक म्हणून या प्रकल्पांमध्ये सहभागी झाल्या असून त्यांच्या सहकार्यातून दरवर्षी काही प्रकल्प साकारले जात आहेत.
No comments:
Post a Comment