यांत्रिकीकरणाच्या या युगात शेतीकडे दिवसेंदिवस दुर्लक्ष होत आहे. निसर्गाची अनियमितता, व्यापा-यांकडून होणारी लूट आदी कारणांमुळे शेतीला लागलेला खर्च निघणार की नाही, याची चिंता नेहमीच शेतक-याला असते. त्यातच ग्रामीण भागातील युवक घरची शेती सोडून रोजगारासाठी शहराकडे जात आहे. मात्र नोकरीपेक्षा आजही शेतीचे महत्व जाणणा-या युवकांचे प्रमाण काही कमी नाही.
वडीलोपार्जित पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतीचे नवीन तंत्रज्ञान उपयोगात आणून कमी खर्चात आणि कमी वेळात भरघोस उत्पादन घेणा-या शेतक-यांचा आदर्शही डोळ्यासमोर आहे. ध्येय आणि इच्छा असली की काहीच अशक्य नाही, याची प्रचिती परभणी तालुक्यातील बोल्डा येथील ज्ञानेश्वर ढोकणे या युवा शेतक-याने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. मग वाळूत घ्यावयाचे पीक चक्क काळ्या मातीत घेऊन या शेतक-याने खरबूजाचे उत्पादन केले आहे.
बोल्डा येथील शेतकरी ज्ञानेश्वर ढोकणे यांनी आपल्या शेतात आठ गुंठे काळ्या जमिनीत खरबुजाची लागवड करुन वीस हजार रुपयांचे उत्पादन घेतले आहे. गावाच्या नदीकाठला लागून त्यांची चार एकर शेती आहे. शेतात असणा-या विहिरीला मुबलक पाणीदेखील आहे. काळी जमीन असूनही त्यांनी आठ गुंठ्यात टरबूज व खरबुजाची लागवड केली आहे
विशेष म्हणजे ही दोन्ही पिके काळीच्या जमिनीत जास्त प्रमाणात येत नाहीत. ही पिके वाळूच्या पट्टयात घ्यावी लागतात. वाळूच्या पट्टयातील उष्णता खरबूजाच्या वाढीला पोषक असते. असे असूनसुध्दा ध्येयाने पछाडलेल्या ढोकणे यांनी काळ्या जमिनीत खताची मात्रा देऊन उष्णता निर्माण केली. त्याचा उपयोग खरबुजासाठी झाला. आतापर्यंत त्यांनी आठ गुंठे जमिनीतील खरबूज विक्रीतून वीस हजार रुपये मिळविले आहेत. विशेष म्हणजे परिसरात खरबुजाचे पीक नसल्याने या खरबुजांना चांगली मागणी आहे.
त्यांना या पिकांबाबत जास्त माहिती नव्हती. तरीसुध्दा शेतीत अभिनव प्रयोग करायचे ठरविले. खरबुजाच्या लागवडीपासून तोडणीपर्यंत तीन ते चार हजार रुपये खर्च झाला. तीन-चार हजार लागत खर्च आणि त्याच्या पाचपट उत्पादन. हे नक्कीच इतर शेतक-यांना उर्जा देण्याचे काम आहे. दिवसेंदिवस बी-बियाणे, खते महागडी होत आहे. त्यातच शेतमजूरांचे दरही आकाशला भिडले आहे. अशा परिस्थितीत ढोकणे यांनी वेगळ्या पध्दतीने शेती करून परिसरातील शेतक-यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. ‘विजेते हे वेगळे काही करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पध्दतीने करतात’ याचाच प्रत्यय या शेतक-याने आणून दिला आहे.
No comments:
Post a Comment