महागड्या रासायनिक खताला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून तलावातील गाळ काढून आपल्या शेतात टाकण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यामुळे शेती उत्पन्नावर चांगला परिणाम झाल्याने तलावातील गाळ बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे.
दरवर्षी रासायनिक खताचे भाव वाढत चालले आहेत. निर्सगाच्या लहरीपणामुळे शेतामध्ये लागवड करण्यात आलेल्या पिकासाठी शेतकऱ्यांना महागडे खत आणि किटकनाशकाचा वापर करावा लागत आहे. पिकासाठी महागडे खत वापरल्याने मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांच्या खर्चाची तोंडमिळवणी होणे कठीत होत चालले आहे.
गेल्या दोन तीन वर्षापासून लोणार तालुक्यातील अंभोरा, पिंपळनेर, टिटवी, देऊळगाव कुंडपाळ या तलावामधून पाणी आटलेल्या जागेवरुन गाळ उपसून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला महसूल विभागातून नाममात्र परवाना शुल्क घेऊन तलावातील गाळ काढून नेण्यासाठी परवानगी दिली जात होती. यावर्षी मात्र शासनाने तलावातील गाळ नेण्यासाठी परवाना शुल्क माफ करुन जेसीबीद्वारे खोदकाम करुन तलावातून गाळ घेतल्यास आणि शेतकऱ्याने त्याबाबतचे कागदपत्र आणि छायाचित्र दिल्यास अनुदानावर डिझेल खर्च देण्याचा निर्णय घेतला आहे.
सद्य स्थितीत पिंपळनेर व अंभोरा तलावातून परिसरातील शेतकरी ट्रॅक्टरद्वारे गाळ घेऊन त्यांच्या शेतात टाकत आहेत. तलावातील गाळामुळे परिसरातील नदी-नाल्यांमधून बरीच खनिजद्रव्ये पाण्यासोबत वाहून येतात. ती गाळात मिसळली जातात. हा गाळ शेतात टाकल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकरी आता महागड्या खताला पर्याय म्हणून आपल्या शेतात तलावातील गाळ टाकत आहेत. हा गाळ त्यांच्या पिकासाठी जणू संजीवनी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
No comments:
Post a Comment