अनादी काळापासून मानव मधाचा अन्न आणि औषध म्हणून उपयोग करीत आला आहे. मधाचे विभिन्न गुणधर्म व मधनिर्मितीसाठी आवश्यक नैसर्गिक घटकांचा अभ्यास करून राज्यातील महाबळेश्वर येथे १९४६ मध्ये मुंबई खादी व ग्रामोद्योग समितीने मधपेट्यांमध्ये मधमाशांच्या वसाहती निर्माण करून मधाचे उत्पादन घेण्याचा ग्रामोद्योग सुरू केला. आजमितीस राज्यातील ४९० गावांमध्ये ४ हजार मधपाळ २७ हजार मधपेट्यांतून दरवर्षी सुमारे ७८.५० लाख रुपये इतके उत्पादन घेत आहेत. त्यामध्ये एकट्या महाबळेश्वरचा वाटा ५० टक्के इतका आहे.
महाबळेश्वरची नैसर्गिक रचना पाहिली असता येथील ७० टक्के भाग घनदाट जंगलांनी व्यापला आहे. येथील सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास करून मुंबई खादी ग्रामोद्योग समितीने १९४६ मध्ये राज्यातील पहिले मधुमक्षिका पालन केंद्र सुरू केले. आज महाबळेश्वर तालुक्यामध्ये राज्यात सर्वाधिक सुमारे २ हजार मधपाळ तर मधमाशांच्या १,६०० वसाहती आहेत. येथून दरवर्षी सुमारे २० ते २५ लाख रुपयांपर्यंत मधाचे उत्पादन घेतले जाते. मधमाशा फुलातून मकरंद गोळा करतात. पुढे शरीरातील पाचक रस त्यात मिसळून व मकरंदातील पाण्याचे प्रमाण कमी करून शुध्द मध पोळ्यात साठवितात. एक किलो मधापासून ३ हजार कॅलरीज उष्मांक मिळतात. एक चमचा मधापासून १०० कॅलरीज मिळतात. मधात क्षार, आम्ले, प्रथिने,जीवनसत्वे, प्रथिने आदी मुबलक प्रमाणात असल्याने शरीरातील या घटकांची कमतरता भरून निघते.
मधुमक्षिका पालनाचे फायदे-
मध हे अत्यंत शक्तिदायी असे पौष्टिक अन्न व औषध आहे. मधापासून मेन तयार केले जाते. तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये मधाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मधमाशांपासून मिळणारे राजान्ने (रॉयल जेली), देश, विष (व्हेमन), पराग (पोलन), रोंगण (प्रोपॉलिन्स) ही सर्व अच्च प्रतीची औषधे आहेत. मधमाशांपासून होणाऱ्या परागीभवनामुळे शेती व फळबागांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळते. तसेच मधमाशांचे संरक्षण व संवर्धन होण्यास मदत मिळते. पर्यावरण समतोल राखून नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी मधमाशा पालन व्यवसाय महत्वाचा आहे. मधुमक्षिका पालन एक नमुनेदार ग्रामोद्योग आहे. यासाठी जागा, इमारत, वीज आदींसाठी खर्च येत नाही. संपूर्ण देशी तंत्रज्ञान असून अल्प खर्च व रोजगार निर्मिती करून देणारा हा उद्योग आहे.
मेणबत्ती, मेण पत्रा, दारूगोळा, शाई, चिकट टेप, वंगण, रंग, वॉर्निश, छपाईची शाई, बूट, औषधे, डोळे व त्वचाविकार आणि रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मधाचा उपयोग केला जातो. मधमाशांपासून मिळणारे पराग हे भूक वाढविणे व रक्तदाब कमी करणाऱ्या औषधांमध्ये वापरले जातात. यामध्ये ३५ टक्के पिष्टमय पदार्थ, २० टक्के प्रथिने तर १५ टक्के पाणी व क्षार असतात.
कामकरी मधमाशांच्या डोक्यात असणाऱ्या फॅरिजियल ग्रंथीमधून रॉयल जेली हा पदार्थ स्रवतो. कामकरी व राणी माशांच्या अळ्यांची संपूर्ण वाढ होईपर्यंत हा पदार्थ त्यांना भरविला जातो. रॉयल जेली भूकवर्धक असून यामध्ये १३ टक्के प्रथिने, १० ते १७ टक्के शर्करा, ५ टक्के स्निग्ध पदार्थ, ६५ टक्के पिष्टमय पदार्थ आदी घटक असतात.
अशी होते मधनिर्मिती-
मधमाशा समुहाने राहतात. एका समुहामध्ये १० ते ३० हजार मधमाशा असतात. त्यामध्ये एक राणीमाशी, कामकरी माशी, नरमाशी यांचा समावेश असतो. या तिन्ही माशा वसाहतीतील प्रमुख घटक आहेत. राणीमाशीचा नराबरोबर हवेत संयोग होतो आणि शुक्रबीज हे राणी माशीच्या पोटात असलेल्या एका विशिष्ट पिशवीत साठवले जाते. त्याचा उपयोग राणीमाशी अंडी घालण्यासाठी करते. संयोग झाल्यानंतर राणीमाशी २४ तासानंतर अंडी देण्यास सुरूवात करते. यामधून कामकरी व नरमाशांचा जन्म होतो. कामकरी व नरमाशा फुलातील पराग व मकरंद गोळा करण्याबरोबरच मधाचे पोळे स्वच्छ करणे, मोठ्या अळ्यांना खाद्यपुरवठा करणे आदी कामे सातत्याने करीत असतात. एका मधपेटीतून वार्षिक सुमारे ६० ते ७० किलो मध मिळतो.
मध उद्योगाच्या विकासाकरिता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग समितीने विविध योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पश्चिम घाट विकास कार्यक्रम योजना, पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशीपालन योजना, मानव विकास मिशन, आत्मा अदिवासी विकास योजना, राष्ट्रीय समविकास योजना या योजनांद्वारे शासन व्यवसायासाठी कर्ज स्वरूपात व कमी व्याजदरात कर्ज स्वरूपात व कमी व्याजदरात अर्थसहाय्य उपलब्ध करून देते. तसेच मधपेट्या, मधयंत्र व लाभार्थींना एक महिन्याचं प्रशिक्षण व विद्यावेतन देखील दिले जाते.
ABHINANDAN iii AAPAN EK CHANGLA UPKRAM RABVAT AAHAT
ReplyDelete