Tuesday, September 13, 2011

रावडीखुर्दच्या शेतकऱ्याने फुलवली फळबाग



सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील रावडी खुर्द येथील गोविंद गणपत रायकर या शेतकऱ्याने ओसाड असणाऱ्या नऊ एकर क्षेत्रात अथक कष्ट, जिद्द आणि कृषी विभागाच्या सहाय्याने फळबाग लागवडीचा यशस्वी प्रयोग करुन अन्य शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

गोविंद रायकर यांनी रावडी खुर्द येथील त्यांच्या ओसाड शेतील कष्टातून नवनवे प्रयोग करण्याचा संकल्प केला. परंतु थोड्याच दिवसांत त्यांच्या लक्षात आले की, या क्षेत्रात साधे गवतही उगवू शकत नाही, एवढे तेथे चुनखडीचे प्रमाण आहे. माती परीक्षण अहवाल तर हे क्षेत्र पिकविण्यायोग्य नाही असाच होता. त्यानंतर दहा वर्षे हे शेत पडून होते. मात्र, म्हणून हे क्षेत्र पिकविण्याच्या विचारापासून रायकर अजिबात बाजूला गेलेले नव्हते. विविध माध्यमातून या विषयावर संवाद साधत हे क्षेत्र हाताखाली आणण्याची त्यांची धडपड सुरूच होती. त्यातूनच त्यांना ही क्षारपड शेती पिकविण्याची दिशा मिळाली. मात्र हे क्षेत्र हाताखाली आणण्यासाठी त्यांची तीन वर्षे खर्ची पडली. आज अनेक अडचणींवर मात करीत या शेतीत फळपिके उभी केली आहेत व ती चांगल्या स्थितीत आहेत.

रायकर हे सोलापूर महानगरपालिकेत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रायकर यांनी पदव्युत्तर शिक्षणानंतर एलएलबी व एमएसडब्लू या पदव्याही प्राप्त केल्या. त्यांच्या कुटुंबात त्या वेळी ते एकटेच शिकलेले होते, तरी सुध्दा त्यांनी शेतीची आवड कायम जपलेली आहे. ते विद्यार्थीदशेत असताना त्यांनी शेतात २०० नारळाची झाडे लावलेली होती. आता त्यांच्या शेतात चिंच पाच एकर, जांभूळ दीड एकर, चिक्कू एक एकर, पेरू तीन एकर (चिंचेत आंतरपीक) आवळा दीड एकर अशा एकूण नऊ एकर क्षेत्रात या फळपिकांची ६२० झाडे उभी आहेत.

नैसर्गिकरीत्या ही पिके उभी राहणे अशक्य असल्याने त्यांनी काही शास्त्रीय माहितीचा आधार घेत व स्वत: काही धाडसी निर्णय घेत का होईना ही पिके उभी करण्यात यश मिळविले आहे. सात वर्षापूर्वी सुरूवातीला त्यांनी एक एकर क्षेत्रावर चिंच घेण्याचा निर्णय घेतला. त्या पिकाच्या चांगल्या स्थितीच्या अनुभवानंतर एक एक करत त्यांनी इतरही फळपिके उभी केली. त्यासाठी त्यांनी पूर्णत: कलमी रोपे वापरली.

जमिनीत काढलेल्या खड्ड्यात काही प्रमाणात मुरूम, तर वरच्या बाजूला तलावातून आणलेली माती भरली. शेणखतावर रोगप्रतिबंधक औषधांचा वापर केला व त्यानंतर या रोपाची लागवड केली. सध्या त्यांच्या या क्षेत्रात चिंचेची २००, आवळा १००, जांभूळ ८०, पेरू १२०, चिक्कू ४०, जांभूळ ८० अशी एकूण ६२० फळझाडांची संख्या आहे.

हे उभे करण्याकरीता त्यांना शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेचा फायदा झालेला आहे. त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर, मंडल कृषी अधिकारी अनिल दुरगुडे, कृषी पर्यवेक्षक सुनील घनवट, विकास भोसले, कृषी सहायक आर.एम. पालवे, मीनल भंडलकर यांचे सततचे मार्गदर्शन उपयोगी पडत गेले आहे. रायकर नोकरीनिमित्त सतत बाहेर असल्यामुळे त्यांना या कामात त्यांच्या पत्नी सौ. कमल यांचीही मोलाची मदत मिळते. पिकांसाठी त्यांनी ठिबक सिंचनाची सोय केलेली आहे. झाडांच्या पाल्यामुळे आपोआपच कंपोस्ट खत तयार होते. दरवर्षी झाडांभोवती रिंग घेत असताना उकरलेल्या मातीच्या जागी नवीन मातीची भर ते टाकत आहेत. तीन एकर चिंचेमध्ये नुकतीच १२० पेरूच्या रोपांची लागवड केलेली आहे.

प्रत्येक वर्षी दोन एकर क्षेत्र या फळबागेखाली वाढविण्याचा त्यांचा निर्णय आहे. औषधे व आंतरमशागती व मजुरीचा खर्च नसल्याने सुरुवातीची तीन वर्षे कष्ट घेतले की, पुढच्या पिढीला उत्पन्नाची एक सोय होऊन जाते, अशा भावना श्री. रायकर व्यक्त करतात.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद