सध्याच्या काळात शेती करणे अवघड झाले आहे. दिवसेदिंवस शेतीतील आव्हाने वाढत असल्याने पारंपारिक पध्दतीवर अवलंबून न राहता सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतीमध्ये उत्पादन वाढ करता येते ही बाब गुंडावार यांनी प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतली. चंद्रपूर जिल्हयातील तालुक्याचे ठिकाण असलेले भद्रावती या शहरापासून ६ किमी अंतरावर चिंचाळा गावात दत्तात्रय गुंडावार यांची शेती आहे. शेतात धान, कपाशी, सोयाबीन असे पारंपारिक पीक घेतले जात मात्र दिवसेंदिवस शेतीतील आव्हाने वाढत असल्याने हमखास अधिक उत्पादन, उत्पन्न मिळविण्याकरीता नव्याने काहीतरी करावे असे गुंडावार यांना वाटत होते.
जिज्ञासू वृत्ती, कल्पकता, प्रचंड उत्साह, यश प्रत्यक्षात आणण्यासाठी तळमळ दत्तात्रय गुंडावार यांच्या अंगी असल्याने शेतीला उद्योग म्हणून स्वीकारुन नवीन संकल्पना, ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून शेती फायदेशीर बनविली आहे. परंपरागत पिकावर अवलंबून न राहता इतर पिकाकडे गुंडावार यांनी लक्ष केंद्रीत केले. इच्छा तेथे मार्ग या म्हणीनुसार शासनाच्या सहकार्याने शेतात १०० चौ.मि.शेडनेट उभारला. शेडनेटकरीता फाऊंडेशन, पाईप्स, अँगल, दरवाजे, नेट उभारला शेडनेट करीता फांऊडेशन, पाईप्स, अँगल, दरवाजे, नेट, स्प्रिंग, तार, मजुरी आदी मिळून २.५० लाख रुपये खर्च आला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कडून ७५ हजार रुपयाचे अनुदान मिळाले. राष्ट्रीय फलोद्यान अभियान मार्फत शेडनेट उभारले.
शेडनेट मध्ये गुंडावार यांनी झिगझॅक पध्दतीने काकडीची लागवड केली. पाण्याच्या सोयीसाठी ठिंबक सिंचनाव्दारे पिकाला पाणी दिले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने पाणी व पिकाचे यशस्वी नियोजन करण्यात यश मिळाले. पिकांच्या वाढीसाठी भद्रावती येथील तालुका कृषी अधिकारी व सहका-यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. शेतीतील नवीन सुधारणा, ज्ञान मिळविण्यासाठी गुंडावार यांनी कृषी संशोधन केंद्राना भेट देऊन तेथील तंत्रज्ञान नवनवीन बियाण्यांचा त्यांनी वापर केला. कृषी संशोधन केंद्रासह कृषी प्रदर्शन, प्रगतीशील शेतक-यांच्या शेतीला भेट देवून त्यांचे अनुभव आत्मसात केल्याने त्याचा प्रत्यक्ष शेतीत उपयोग करण्यासाठी फायदा झाला.
पर्यावरणाच्या दृष्टीने कमीत कमी रासायनिक खताचा वापर केला. शेतातील अपार कष्टाचे फळ गुंडावार यांना मिळाले. त्यांच्या कष्टाचे चीज झाले. शेडनेटमध्ये त्यांना काकडीचे विक्रमी उत्पादन प्राप्त झाले. याशिवाय आंतरपीक म्हणून पालक व इतर पिकही उत्तम बहरले. काकडीचे ५५ क्विंटल उत्पादन झाले. यात बियाणे, खत प्रत्येकी १००० रुपये, सेंद्रीय खत २५०० रु, फवारणी खर्च ४ हजार रु.मजुरी ५ हजार, निंदन खर्च २ हजार व इतर खर्च २५०० रुपये असा एकूण १८ हजार रुपये खर्च लागला. काकडीचे ५५ क्विंटल उत्पादन सरासरी १५ रु.किलो दराने विक्री केली यातून ८२,५०० रुपये प्राप्त झाले. याशिवाय आंतरपिकातून १८००० रुपयाचे उत्पन्न मिळाले. अशा प्रकारे एकूण १,००,५०० रुपये उत्पादन झाले. एकूण उत्पादन १,००,५०० रुपयांमधून लागलेला खर्च १८ हजार वगळता ८२ हजार रुपयाचा नफा गुंडावार यांनी मिळविला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीत मिळालेले भरीव यशाचा मूलमंत्र गुंडावार इतर शेतक-यांना देत असतात. भरघोस उत्पादनातून गुंडावार यांची कुटूंबाची परिस्थिती सुदृढ बनविली आहे. स्वत:च्या यशाची गाथा इतर शेतक-यांना सांगून त्यांना समृध्दीचा मार्ग दाखविला आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्याची शासनासह स्वयंसेवी संस्थानी दखल घेऊन यथोचित सन्मान केला आहे. गुंडावार यांना २०१० मध्ये महाराष्ट्र शासनाने शेतकरी गौरव पुरस्काराने सन्मानीत केले.
शेतकरी एकता मंचतर्फे कृषिनिष्ठ पुरस्कार, भद्रावती नगर परिषदतर्फे भद्रावती भुषण पुरस्कार, भारतीय कृषक समाजातर्फे कृषी पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, तसेच राष्ट्रसंत सेवा गौरव पुरस्काराने गौरवान्वीत करण्यात आले आहे. बदलत्या काळात शेती व्यवसाय डब घाईस आला असताना आधुनीक तंत्रज्ञानाची कास धरत शेतीला फायदेशीर उद्योगाचे स्वरुप देऊन दत्तात्रय गुंडावार यांनी शेतक-यांना जगण्याच नवीन बळ दिले आहे.
No comments:
Post a Comment