Sunday, October 16, 2011

शेतक-यांनी तयार केली पाण्याची बँक


सातारा तालुक्यातील धावडशी हे छोटेसे गाव. या गावातील १५ शेतकऱ्यांनी एकत्र येउन गावातील विहिरी जोडण्याचा नवा विचार मांडला आणि सर्वानुमते विचारांती योग्य नियोजन होउन विहिरी जोडण्याचा निर्धार पक्का झाला. पाऊसकाळात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी उत्तरेकडील मेरूलिंगच्या डोंगराकडील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून. पावसाळा संपल्यावर शेतीसाठी जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी या तरूणांनी विचार करण्यास सुरवात केली. साता-यातील सामाजिक कार्येकर्ते डॉ.अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन त्यांना मिळू लागले. गावातील पोलिस पाटील ज्योतिराम पवार आणि त्यांच्या सहका-यांनी पुढाकार घेतला आणि विहिरी जोडण्याचे काम सुरू झाले.



उपाय योजनेला तसा सर्वांनीच एकमुखी पाठिंबा दिला नाही.पण तरुणांनी प्रयत्न सुरू ठेवले. आपल्या विहिरीत पाणी आहे, आपले भागते, पण इतरांना ते का द्यायचे, असा प्रश्न येथेही उपस्थित झाला. तरीही अतिरिक्त पाणी इतरांना देण्याची मानसिक तयारी तरुणांनी करून घेतली. जलवाहिनी ज्या दिशेने जाणार, त्या परिसरातील गुलाब नामदेव पवार, ज्योतिराम गुलाब पवार, नामदेव गुलाब पवार, बाबा गुलाब पवार, मारूती लक्ष्मण अनपट, दिलीप गुलाब पवार, अविनाश बजरंग पवार, रामचंद्र पवार, धोंडीराम पवार, विनोद पवार,मारूती तुकाराम पवार, अंकुश एकनाथ पवार, चैतन्य नवाथे, सचिन पवार यांसह १५ शेतकरी खातेदारांनी या विचाराला मान्यता देऊन आपला सहभाग नक्की केला.कागदावरची योजना प्रत्यक्षात आणली.

गावातील ओढ्यानजीक दोन विहिरींत पाण्याचे प्रमाण इतर विहिरींच्या तुलनेत चांगले होते. जसजसे डोंगराकडे जाल तसतसे विहिरीतील पाण्याचे प्रमाण कमी कमी होत होते. जुन्या तळ्यातील पाणीही वाहून ओढ्याला जायचे. हे वाया जाणारे पाणी आणि आजूबाजूच्या कूपनलिकांचे अतिरिक्त पाणी ओढ्याजवळील दोन विहिरींमध्ये घ्यायचे. या दोन विहिरींपासून डोंगराच्या दिशेने जलवाहिन्या टाकून दोन विहिरींतील अतिरिक्त पाणी इतर कमी पाणी असणा-या विहिरींमध्ये टाकायचे, तेथून ते गरजेप्रमाणे शेतक-यांनी घ्यायचे. हे धोरण या तरुणांनी अवलंबिले.

विहिरी जोडण्याच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेमुळे गावातील सहभागी शेतकऱ्यांना पाण्याचा समान पुरवठा होवू लागला. या उपक्रमाच्या यशस्वीतेनतर कोरडवाहू क्षेत्र बारमाही होणार होते, १५० ते २०० एकर क्षेत्रांत बारमाही पिके घेण्याची क्षमता निर्माण होणार होती. या उपक्रमामुळे गावातील ८४ शेतक-यांना पाणी मिळणार, या पाण्यामुळे आंबा, सीताफळ अशी फळबाग लागवड होण्यासही मदत होणार आहे, तसेच वांगी ,भेंडी, मिरची व इतर भाजीपाला उत्पादन वाढण्यासही मोलाची मदत होणार होती. सोयाबीन, घेवडा, आले, भुईमुग, भात, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या क्षेत्रात वाढही निश्चित आहे, पाण्याच्या उपलब्धतेमुळे या परिसरात झेंडू, ग्लॅडिओलसची फुले बहरणार असल्याने गावातील शेतकरी सुखावला होता.

पर्जन्यसुगी यंत्रणा म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या नागेवाडी गावात ही यंत्रणा विकसित केली. त्यामुळे दुष्काळासाठी परिचित असलेल्या या गावाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. ही यंत्रणा उभी करण्यात ग्रामस्थांचा पुढाकार राहिला. भूजल वैज्ञानिकांचे मार्गदर्शन मिळाले. प्रत्येक घरावरील पन्हाळीवर टी आकाराचा पाईप जोडून पीव्हीसी पाईपलाईन बोअरलाईनपर्यत नेली. गावात सार्वजनिक आणि खासगी अशा २८ विंधनविहिरी, प्रत्येक विंधन विहिरीजवळ खड्डा खणून त्यात सोडण्यात आले. साठलेले पाणी बोअरिंगमध्ये गेले. गावाची पाण्याची बॅक तयार झाली. नाला बंडिंग,सिमेंटचे बांध,फार्म बंडिंग, वनीकरण अशी अनेक कामे हाती घेण्यात आली.आता या भागात तीनशे एकरांत द्राक्षबागा आहेत. शिवाय केळीच्या बागा, हळदही मोठ्या प्रमाणावर होत आहे. गाव दूधदूभत्याबाबतही स्वयंपूर्ण झाले आहे.

पावसाचा पडणारा एकही थेंब गावाबाहेर जाऊ देणार नाही, असा निर्धार करून दुष्काळी माण तालुक्यातील लोधवडे येथील ग्रामस्थंनी जलक्रांती केली आहे. एरवी टॅकरची वाट पाहणारे हे गाव जलसंधारणाच्या कामामुळे पाण्याच्या बाबतीत समृध्द झाले आहे. बागायती पिके घेऊ लागल्याने गावकऱ्यांच्या खिशात पैसे खुळखुळू लागले आहेत. गावात पाटबंधारे विभागाचा एक तलाव असून, दोन पाझर तलाव आहेत. ४९३ हेक्टर क्षेत्रांत बांधबंदिस्ती करण्यात आली. २९ नालाबंडिंग, ६० अनगड दगडी बांध, मातीचे ५० बांध,सलग समतल चार १५० हेक्टर, याशिवाय लोकसहभाग व श्रमदानातून तीन गॅब्रियन बंधारे व एक भूमिगत बंधारा बांधण्याता आला आहे. गावातील १०० विहिंरीचे पुनर्भरण करण्यात आले आहे. तसेच छतावरील पावसाचे पाणी संकलन करण्याचे दोन प्रकल्प राबवण्यात आले आहेत.

सातारा जिल्हयात जलसंधारण आणि लोकसहभागातून जमीनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब अडवून तो जमीनीमध्ये मुरविण्याच्या कामाला लोकांनी पाठबळ दिले, यातूनच या गावकऱ्यांनी गावातच स्वकर्तृत्वातून आणि लोकसहभागातून पाण्याची स्वत:ची पाणी बँक तयार करु शकले, आणि म्हणूनच धावडशी, नागेवाडी, लोधवडे, निढळसारखी गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास सक्षम बनू लागली आहेत. या गावांचा आदर्श जिल्हयातील अन्य गावानी घेउन पाण्याची बँक बनविण्यात पुढाकार घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद