राज्याच्या तुलनेत विदर्भात जंगलाचे प्रमाण जास्त आहे. नैसर्गिक संतुलनासाठी किमान ३३ टक्के वनजमीन असणे आवश्यक असते. परंतु राज्यातील वनांचे प्रमाण कमी आहे. ज्यांनी जंगल वाचविले त्याच भागातील लोकांना वन्यप्राण्यांचा त्रास होऊ लागला आहे. तसेच बऱ्याच वेळा विकास प्रक्रियेत वनसंरक्षण कायद्याचा अडसरही निर्माण होतो. तेव्हा त्यांच्या तोंडून सहज उद्गार निघतात, आम्ही जंगल वाचविले तर काय गुन्हा केला? ही त्यांची रास्त भावना लक्षात घेऊन प्रशासनही त्यांच्या मदतीला धावले आहे. वन्यप्राण्यांच्या त्रासाने होणाऱ्या पिकांच्या नुकसानापायी येथील शेतकरी घायाळ झाला होता. निसर्गाच्या लहरीपणासोबतच वन्यप्राण्यांच्या पिकावरील हल्ल्याने येथील शेतकरी अक्षरशा त्रासला गेला होता. त्यांचे अश्रु पुसायला कुणाच्या तरी पुढाकाराची, कुणाच्या तरी सहकार्याच्या भावनेची आवश्यकता होतीच.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा अभयारण्यालगतची गावे दुर्लक्षित राहिली होती. यात प्रामुख्याने वस्तापूर, वाघा, कासमार, महान या गावांचा समावेश होतो. या गावातील सुमारे ३,००० ग्रामस्थ शेतकरी सदैव चिंतेत असायचे. कारण काटेपूर्णा हे अभयारण्य ३२१.५१ हेक्टर क्षेत्राचे असून या अभयारण्यात १०२ निलगाय, १३५ चितळ, ४१० लंगूर, १२ भेकड, २ चौसिंगा, १४० जंगली डुकर, ५ बिबट, १ वाघ, ४ तरस, २ अस्वल, ३ कोल्हे, ३५ हरिण, १० मोर, आणि १०० हून अधिक ससे अशा प्रकारचे विविध प्राणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याचा त्रास शेतकऱ्यांना व्हायचा.
जिल्हा प्रशासन यावर काय उपाय करावा याचाच सतत विचार करायचे. शेवटी यावर मार्ग सूचला आणि शेतकऱ्यांची डोकेदुखी कायमची दूर झाली. तो उपाय म्हणजे जिल्हा प्रशासनाने सौर ऊर्जा कुंपण ही नाविण्यपूर्ण योजना आखली व ती अंमलात आणली. तत्कालीन जिल्हाधिकारी मुथुकृष्णन संकरनारायण, अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे विभागीय कृषी सहसंचालक सुरेश आंबुलगेकर, विभागीय आयुक्त प्रविण परदेशी यांनीही त्यास चांगले प्रोत्साहन दिले. शेतकऱ्यांची व्यथा दूर व्हावी, शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण व्हावे आणि वन्यप्राण्यांचेही संरक्षण व्हावे यादृष्टीने सौर उर्जेचे कुंपण पूर्ण करुन घेण्यात पुढाकार घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन करणारे जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीचे सदस्य सुरेश कोहचाडे यांचेही योगदान यासाठी महत्वपूर्ण ठरले.
या सौर ऊर्जा कुंपणाच्या नाविण्यपूर्ण योजनेमुळे आदिवासी व इतर समाज बांधव शेतकऱ्यांच्या पिकाचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण झाले. यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. त्याचप्रमाणे आदिवासी बांधव व इतर समाज बांधवांच्या बकऱ्या, गुरे-ढोरे यांचे सुध्दा वन्यप्राण्यांसून होणारे नुकसान वाचविता आले. वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी आणि आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना २४ तास लक्ष ठेवावे लागत होते. ती आता रात्रपाळीची ड्यूटी करण्याची गरज राहिली नाही. जंगलालगतची गावे प्रामुख्याने वाघा, वस्तापूर, कासमार, महान, झोडगा, वाई, खापी अशा अनेक गावांना याचा फायदा झाला. वन्य प्राण्यांचे शिकाऱ्यांपासूनही संरक्षण झाले त्यामुळे आता त्यांना भीतीमुक्त संचार करता येतो. अभयारण्यातील लाकुडतोड आणि तेंदुपत्ता तोड करणे बंद झाले आहे. तसेच शेतकऱ्याच्या पाळीव प्राण्यापासून सुध्दा अभयारण्यातील प्राण्याची शिकार करणे बंद झाले आणि अभयारण्यातील विविध वनस्पतींचे संरक्षण झाले, असे विविध प्रकारचे फायदे झाले असल्याची माहिती वाघा ग्रामपंचायतीच्या सरपंच मिराबाई हजारे, उपसरपंच रमेश बेटकर, पोलीस पाटील हिंमतराव बेटकर यांनी सांगितले. हे सौर ऊर्जा कुंपण पूर्ण करुन देण्यात आम्ही गावकऱ्यांनी १० टक्के लोकवर्गणी भरण्यापेक्षा १५ टक्के लोकवर्गणीची रक्कम जमा केली, याशिवाय श्रमदानही केले. कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी अरुण गावंडे आणि कृषी पर्यवेक्षक बी.जे. वाघमारे यांनीही चांगले सहकार्य केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यात राबविलेला अभिनव असा हा प्रयोग राज्यातील वनालगतच्या गावांना प्रेरणादायी ठरु शकतो, हे मात्र ठळकपणे सिध्द झाले आहे.