Thursday, October 20, 2011

इतिहास खेड्यांचा..


खेडे हा समाजाच्या उत्क्रांत अवस्थेतील एक महत्वाचा टप्पा आहे. त्याची निरनिराळी अवस्थांतरे व विविध प्रकार आहेत. ते समजून घेतले म्हणजे तेथील लोकजीवनाची, संस्कृतीची, नात्या-गोत्याची निरनिराळी अंगे लक्षात येतात. खेडयांचे अनेक प्रकार आहेत. त्यात स्थलांतर करणारी खेडी, अंशत: स्थायी खेडी, कायम स्थायी खेडी, नदी काठावरील खेडी, डोंगराळ व वालुकामय प्रदेशातील खेडी, नागरी समुदायाजवळची खेडी, जमीनदारी खेडी, रय्यतवाडी खेडी, सहकारी खेडी इत्यादी प्रकारात खेडयांची वर्गवारी करण्यात येऊ शकेल.

भारत हा खेडयांचा देश आहे. भारतातील ७० टक्के लोक आज सुध्दा खेडयांतच राहतात. त्यामुळे भारतीय जीवनाचे खेडे हे प्रमुख केंद्र फार प्राचीन काळापासून आहे. वेदकाळातील वाङमयामध्ये खेडयांचे महत्व वर्णिले आहे. एकंदरीत सर्वच दृष्टीकोनातून खेडयांचे भारतीय जीवनातील महत्वपूर्ण स्थान निश्चित झाले आहे. राज्यकारभारातील प्रमुख घटक म्हणून, सांस्कृतिक जीवनातील प्रमुख केंद्र म्हणून, सामाजिक जीवनातील प्रमुख आधार म्हणून खेडयांचे महत्व ओळखले गेले आहे. भारताचा आत्मा खेडयात राहतो, असे यथार्थ वर्णन महात्मा गांधी यांनी केले होते.

प्राचीन काळात दळणवळणाच्या साधनांचा पूर्णपणे अभाव असल्याने खेडयांचे महत्व आजच्याहून प्रकर्षाने जास्त जाणवत होते. प्राचीन काळी खेडी गावापेक्षाही महत्वाची मानली जात असे. खेडयांची भरभराट व्हावीअशी प्रार्थना वेदमंत्रात केल्याचे आढळून येते. बिंबिसार राजाच्या काळात महत्वाच्या प्रश्नांची चर्चा व शासनाचे धोरण ठरविण्यासाठी ग्रामिणांना बोलाविण्यात येत असे. वेदामध्ये खेडयांचा उल्लेख वारंवार केलेला आढळतो. इ.स. पूर्वी ४ थ्या व ५ व्या शतकातील जातक कथात प्राचीन खेडयांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवनाचे वर्णन आढळते. ग्राम, पूर व नगर या तीन वस्तीस्थानांकडे लक्ष वेधून शासनाच्या दृष्टीकोणातून ग्राम हेच केंद्र महत्वाचे होते, असे मनूने स्पष्ट केले. शुक्रनीतिसार या प्राचीन ग्रंथातसुध्दा कुंभ, पाली व ग्राम अशा वसतिस्थानाचा उल्लेख आहे.

अर्थववेदातील पृथ्वीसूक्तात समितीचा उल्लेख केला आहे. सामूहिक व संघटित जीवनाचे महत्वाचे विवरण ऋगवेदाच्या १० व्या मंडलातील शेवटच्या सुक्तात केले आहे. वाल्मीकी रामायणात घोष व ग्राम या दोन खेडयांच्या प्रकाराचे वर्णन आहे. खेडयांचा कारभार पाहणाऱ्या ग्रामिणांच्या महत्वपूर्ण स्थानाचाही उल्लेख आहे. इ.स. पूर्वीच्या ५ व्या शतकातील जैन व बौध्द वाङमयात स्वयंशासित खेडयांचा उल्लेख आढळतो. इ.स. पूर्वी ३०३ या काळात मॅगॅस्थेनिस हा ग्रीक राजदूत बराचकाळ भारतात राहिला होता. त्याने खेडयांच्या कारभार पध्दतीचा गौरव करुन भारतीय खेडयांचे स्वतंत्र लहान राज्य असे वर्णन केले होते.

यादव काळात म्हणजेच इ.स. १००० ते १३५० या काळात नगर व ग्राम यांच्यामध्ये 'खर्वट' नामक एक ग्राम प्रकार होता. ग्राम, खर्वट आणि नगर यांच्यातील भेद क्षेत्रफळाप्रमाणे लोकवस्तीवरही अवलंबून होता. ज्या शिवारात पांढरी व काळी यांच्यामध्ये चोहोबाजूंनी 'शंभरधनू' एवढी जमीन पडीक असेल ते गाव, ही पडीक जमीन दोनशे धनु असून तेथे काटेरी झुडपे असतील तर ते खर्वट आणि दाट लोकवस्तीच्या फार मोठया गावांत लागवड केलेल्या जमिनीमध्ये चारशेहून जास्त धनुचे क्षेत्र पडीक असले तर ते नगर गणले जात होते.

भारतीय खेडयाची परिपूर्ण स्वयंशासन पध्दती पाहून अफगाण व मुस्लीम राज्यकर्त्यानी भारतीयांच्या परंपरा व रुढीत कोणतीच ढवळाढवळ केली नाही. गियासुद्दीन तुघलकाने तर प्रथागत कायद्यात हस्तक्षेप करु नये अशी आज्ञाच आपल्या अधिकाऱ्यांना दिली होती. ग्रामीण समाजाची शक्ती व प्रेरणा ग्रामपंचायतीत सामावलेली होती. म्हणून वैदिक काळापासून ते ब्रिटिश साम्राज्यापर्यंत कित्येक राजे आले व गेले पण खेडयाचे स्वायत्त व संघटित जीवन अभंग राहिले. समर्थ व नेटक्या ग्रामपंचायतीचे विघटन खऱ्या अर्थाने ब्रिटीश काळातच सूरु झाले. ब्रिटीश पूर्व भारतीय खेडे स्वयंपूर्ण, स्वतंत्र व स्वायत्त होते. गृहकेंद्रीत उत्पादनपध्दती असल्याने सर्व ग्रामवासियांच्या आर्थिक गरजा पुरविणे एवढेच मर्यादित ध्येय खेडयांचे होते. इंग्रजांनी स्वतंत्र मोठे कारखाने उभे करुन मालाचे शिलकी उत्पादन सुरु केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी खेडे जोडल्या गेले. सहाजिकच खेडयांची स्वयंपूर्णता संपली. त्याबरोबर ब्रिटीशांनी स्वतंत्र न्यायालये स्थापिली. खेडयाच्या सुव्यवस्थेसाठी अधिकाऱ्याची नेमणूक केली. सारावसूलीही हा अधिकारी करु लागला. त्यामुळे प्राचीनकाळची ग्रामपंचायत निष्प्रभ होऊन तिचे विघटन चालू झाले. याचा विदारक परिणाम तत्कालीन खेडयांवर झाल्यावाचून राहिला नाही. आजसुध्दा खेडी दरिद्री, अविकसित व कमालीची अस्थिर वाटतात.

भारतीय समाजजीवन उध्वस्त होण्यास अकराव्या शतकातील मोगलाचे आक्रमण कारणीभूत ठरले. त्यांच्या आक्रमकांनी अराजकता अनागोंदी कारभार, मुर्तीभंजन व लुटालुटीला ऊत आणला होता. सोळाव्या शतकात मुस्लिम आक्रमक भारतात स्थिर होऊ लागल्याबरोबर प्राचीन भारतीय खेडयातील समाजजीवनाचे सुखद चित्र बदलू लागले. नाही म्हणायला छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्थेचे दुर्दैवी दिवस संपविले. परंतु नंतरच्या मुसलमान आमदानीत प्राचीन स्वयंशासीत संस्थांची शान संपली व एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत प्राचीन ग्रामसंस्था नामशेष झाल्या. मोगलांच्या काळात सुरु झालेल्या खेडयांच्या विघटनाला ब्रिटीश राजकर्त्यानी जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले. एका वेगळया व स्वार्थी हेतूने प्रेरित होऊन इ.स. १६८९ सालापासून ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय खेडयांच्या अभ्यासाला सुरुवात केली. नुसत्या व्यापारात वर्चस्व प्रस्थापित करण्यापेक्षा लोक आणि जमीन यावर वर्चस्व स्थापित करणे त्यांना महत्वाचे वाटले.

खेडयांचा अभ्यास-
भारतीय खेडयांच्या अभ्यासाला अठराव्या शतकाच्या मध्यापासून सुरुवात झाली. १८०० साली डॉ.फ्रान्सिस बुखानन यांनी मद्रास म्हैसूर, बिहार बंगाल राज्यातील खेडयांच्या अवस्थेविषयी अहवाल तयार केला. १९१६ साली भारतातील ब्रिटीश प्रशासकाने फरीदपूर जिल्हयातील आर्थिक जीवनाविषयी स्वयंस्फूर्तीने जाणून घेतले. १९२० साली महात्मा गांधीनी सुरु केलेल्या राष्ट्रीय चळवळीने भारतीय खेडयांकडे अभ्यासकांचे लक्ष गेले. मुंबईतील जी किटींग्ज व हॅरोल्ड मॅन, मद्रासमधील गिल्बर्ट स्लेटर पंजाबमधील इ.व्ही.लुकस यांनी शेतीविषयक समस्या व विविक्षित खेडयांच्या अभ्यासाला सुरुवात केली. १९३० साली समाजशास्त्रज्ञ, प्रशासक, सामाजिक कार्यकर्त्यानी भारताच्या विविध भागातील खेडयांच्या अभ्यासाला सुरुवात केली. बंगालमध्ये १९३५ साली आर्थिक संशोधन मंडळाने खेडयांची पाहणी केली. १९३२ मध्ये प्रा. भट्टाचार्य व प्रा. नाटसेन यांनी बंगालमधील ग्रामीण जीवनाचा अभ्यास केला. महाराष्ट्रात पुण्यामधील गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संशोधन संस्थेतर्फे १९४० च्या दरम्यान खेडयांची पाहणी केली. १९४८ सालापासून केंद्र व राज्यसरकारांनी खेडयांच्या अध्ययनाला प्रोत्साहन दिले. थोडक्यात १९५० पर्यंतचा कालखंड हा खेडयांच्या अभ्यासातील पहिला टप्पा होता असे म्हणायला हरकत नाही.

प्रतिकूल काळामध्येसुध्दा टिकून राहणे हे प्राचीन भारतीय खेडयांचे वैशिष्टयच आहे. भारताच्या सर्व भागात व बाहय जगतात कितीही राजकीय, आर्थिक सामाजिक उत्पात झाले असले तरी खेडी अभंग राहिली. १८१९ साली माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी लिहिलेल्या अहवालात ते म्हणतात, भारतीय ग्रामीण संस्थामध्ये लहान प्रमाणात राज्याची सर्व अंगे आहेत. इतर कोणत्याही शासनाला जरी ग्रामवासियांचे रक्षण करता आले नाही तरीसुध्दा ग्रामसंस्था ग्रामवासियांचे रक्षण करण्यास पुरेशा समर्थ आहेत.

भारतीय ग्रामीण संस्था चेतनाहीन नसून, त्या जिवंत संस्था आहेत. कितीतरी साम्राज्ये आली, राजकारणी आले व भंग पावले पण कासवाच्या पाठीसारखी भारतीय खेडी तशीच अभंग राहिली. हिंदू, पठाण, मोगल, शीख व इंग्लिश लोकांनी भारतावर अधिराज्य गाजविले पण भारतीय खेडयात कोणताच बदल झाला नाही. त्या त्या काळात ती थोडी कमकुवत व निष्प्रभ ठरतील. पण ती नदीतील लव्हाळयासारखी मजबूत राहिली.

खेडयांचे प्रकार

भारतात खेडयांचे दोन प्रकार आहेत. यात संयुक्त खेडे व पृथक खेडे असे वर्गीकरण करण्यात येते. संयुक्त खेडयात सर्व जमीन सुसंघटित अशा मंडळाच्या मालकीची असते, यात पतिदारी संयुक्त खेडे आणि जमीनदारी संयुक्त खेडयांचा प्रकारही आहे. रयतवारी खेडे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात दिसून येते. यात जमीनमालकी सर्व खेडयाची नसून त्या त्या व्यक्तीची असते. जमीनमालकच शेतसाऱ्याला जवाबदार असतो.याशिवाय स्थानांतर करणारी खेडी, अंशत: खेडी, स्थायी खेडी, मध्यवर्ती खेडी, विखुरलेली खेडी, रेखात्मक वसाहतीची खेडी आहेत. वर्तुळाकार वसाहतीची खेडी इस्त्रायलमध्ये आढळून येतात.

जमिनीच्या मालकीवरुन सुध्दा खेडयांचे प्रकार आढळून येतात. यात जमीनदारी खेडी, सहकारी खेडी, सामुदायिक खेडी यांचा समावेश आहे. पृथ्वीच्या पाठीवरील खेडयांच्या उदयाची कारणे जरी समान असली तरी सुध्दा खेडयांचा आकार, रचना, सामाजिक जमीन इत्यादी बाबतीत कमालीची असमानता दिसून येते. म्हणूनच भौतिक व अभौतिक दृष्टीकोणातून विचार करता खेडयांचे विविध प्रकार आढळून येतात.

महाराष्ट्रातील खेडयांचा विचार करायचा झाल्यास नद्यांच्या काठावर मोठया प्रमाणात खेडी वसली आहे. केवळ महाराष्ट्रातच नद्यांच्या काठावर खेडी आहेत असे नव्हे, तर जगातही खेडी नद्यांच्या काठावरच वसलेली आहेत. अत्यंत प्राचीन काळापासून माणसांचे, टोळयांचे, कबिल्याचे स्थायीकरण झाले. त्यातूनच खेडी अस्तित्वात आली.

ब्रिटिश आमदानीतील मॉटफॉर्ड अहवालामध्ये जिल्हयाचे सरासरी क्षेत्रफळ ४४३० चौ.मैल असते असे म्हटले आहे. तालुक्याच्या आकाराची पण हीच स्थिती आहे. काही तालुक्यात ५० गावे, तर काही तालुक्यात ४०० च्या वर गावे आढळतात. विदर्भातील तालुक्यातच अधिक गावे अंतर्भूत केलेली दिसतात. सामान्यत: प्रत्येक तालुक्यात १०० ते २०० गावे असतात. महाराष्ट्रात नागरीकरण झपाटयाने होत असले तरी खेडयांचे प्रमाण मात्र कमी झालेले दिसत नाही.

खेडे म्हणजे कायद्याने निश्चित व ठराविक सीमा असलेला व ज्याचे मुलकी कागदपत्र वेगळे तयार केले जाते असा शासकीय घटक मानला आहे. खेडयांची नावे देताना देव, नदी, घाट, तळे, डोंगर, टेकडी, दरी, झाडे, फले, फुले, धान्य, पशू, पक्षी यांचा उपयोग केला जातो. काही गावांवर तर कानडी तेलगू भाषेचाही परिणाम झाला आहे. मोगलांच्या राजवटीचा काही गावांवर परिणाम दिसतो. इंग्रजी राजवटीत त्यांच्या सुलभ उपयोगासाठी ब-याच गावांची नावे अशुध्द व विकृत पध्दतीने उच्चारली जात असे.

महाराष्ट्रात एकाच नावाची एकाहून जास्त खेडी आहेत. त्यापैकी प्रत्येकाची निश्चित ओळख पटण्यासाठी काही शब्द वापरले आहेत. जसे कवडसी नाईक, कवडीस रोडी, कळंबे तर्फ काळे, कळंबे तर्फ ठाणे, किटाडी बोरमाळा, किटाडी चक, किटाडी मेंढा, किटाडी रीठ, किटाडी मक्ता हे शब्द त्या खेडयाच्या नावाचेच भाग आहेत. महाराष्ट्रात क हे आद्याक्षर असलेल्या खेडयांची नावे सर्वात जास्त म्हणजे ४१५१ आहेत, तर म या अद्याक्षराची खेडी ३२४० आहेत. तर स हे अद्याक्षर असलेली २९३० व प हे अद्याक्षर असलेली २८६९ खेडी आहेत.

पिंपळगाव या नावाच्या खेडयांची संख्या सर्वात म्हणजे १७६, बोरगाव १६७, चिंचोळी ११०, सावरगाव १८४, पळसगाव ३१, आमगाव २३, आंबेगाव १६ अशी आहेत. फणस या वृक्षाच्या नावाशी निगडीत असलेली १३ नावे फक्त कुलाबा व रत्नागिरी जिल्हयातच आहेत. आंब्याच्या वृक्षांची विपुलता असलेल्या कुलाबा व रत्नागिरी जिल्हयात आंबेगाव नावाचीफक्त दोनच खेडी असावीत हे एक आश्चर्यच आहे. देवांच्या नावाशी संबंधित असलेली खेडीही भरपूर आहेत. त्यात राम नावावरुन पडलेल्या गावांची संख्या सर्वाधिक म्हणजे १२५ आहे. त्यानंतर कृष्ण, गणेश व गोविंद या देवांचा क्रमांक लागतो.

ऊसगाव, डाळींब, नारळी, जांभोळ, करवंद, कवठा, केळी, टरबुजापूर या फळांच्या नावाने सुध्दा गावे आहेत. याशिवाय हत्तीडोई, हत्तीपांगडी, हरणखेडे, हरणखुरी, उंटावध, उंटापल्ली, घोड, खेचरे, कोल्हा, शेळी, बंदर, नागझरी, घुबडी, पारवा, पाल, टोळ, मासा या प्राण्यांच्या व पक्षांच्या नावाने सुध्दा खेडी आहेत. समाजातील नातेसंबंधांचे दृष्य स्वरुप आपल्याला खेडयाच्या नावातही दिसते. मेहुणा, मेहूणी, सासरा, बिबी, बेटी, ताई या नावाची सुध्दा खेडी आहेत.

महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात प्रामुख्याने खडकी, खानापूर, गंगापूर, गणेशपूर, चिखली, चिंचोली, जवळा, जळगाव, जांबगाव, टाकळी, डोंगरगाव, तळेगाव, तांदूळवाडी, दहिगाव, देवगाव, दहेगाव, नांदगाव, नायगाव, पळसगाव, पांगरी, पाडळी, पारडी, पिंपरी, पिंपळगाव, मालेगाव, राजापूर, शहापूर, शिवणी, हिंगणी, सांगवी, सावरगाव, सुकळी, वडगाव, अडगाव, इसापूर, धानोरा, धामणगाव, बोरगाव, बोरी या नावाची गावे हमखास असतातच. विभागवार विचार केल्यास काही नावे विशिष्ट विभागातच आढळतात. खैरी, तरोडा,

नवरगाव, नवेगाव ही गावे नागपूर विभागातच आढळतात. तर परसोडा, परसोडी, आमगाव, उमरी, हिवरा ही औरंगाबाद व नागपूर विभागात आढळतात.

आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्याच्या सीमेवर असलेल्या खेडयांच्या नावावर तेलगू व कानडी भाषेचा प्रभाव दिसून येतो. तेलगू भाषेत पल्ली व कानडी भाषेत हळ्ळी याचा अर्थ खेडे असा होतो. गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयातील तालुक्यात पल्ली हे उपपद असलेल्या नावांची १०९ खेडी आहेत, तर कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सोलापूर जिल्हयात चिक्केहळ्ळी, नागनहळ्ळी, कंटेहळ्ळी, करतेहळ्ळी ही गावे आहेत.

फक्त एक अक्षरी नाव असलेली ६ खेडी आहेत. त्यात टो, पू, सो, भू, जू, जूं यांचा समावेश आहे. आलनंदी ऊर्फ तुमारगुडा मसाहत आणि तांदूळवाडी परगणे शेंदूरवादा अशी लांबलचक नाव असलेली २ खेडी आहेत. इंग्रजी नाव असलेली ग्लासफोर्ट पेटा, ब्रिटिश शिरवडे, बटनपूर, गार्डनपूर आणि पॉनमारी ही गावे आहेत. लोणी नाव असलेली खेडी महाराष्ट्रात ५७ आहेत, तर न्हावी नावाची ९ खेडी असून ती धुळे, पूणे व सातारा जिल्हयात आहे. टण्णू, भाडभीड, झालियामोठा, लहान, घनसडमनसड, थेरडी, घानमुख, खिनखीनी, शिस्त, लोणी नाव असलेली महाराष्ट्रात ५७ खेडी आहेत. न्हावी नावाची ९ खेडी असून ती धुळे, पूणे व सातारा जिल्हयात आहे.

ज्यांच्या नावापुढे खुर्द किंवा बुद्रुक असे उपपद जोडलेले आहे, अशी खेडी महाराष्ट्रात २६३८ आहेत. बुद्रुक शब्दाची उत्पत्ती बुजुर्ग या फारशी शब्दावरुन झाली आहे. त्याचा अर्थ मोठा असा होतो, तर खुर्द या शब्दाचा अर्थ लहान असा होतो. चक शब्द जोडलेली २२९ गावे असून ती सर्व चंद्रपूर व गडचिरोलरी जिल्हयामध्ये आहे. चक या शब्दाचा अर्थ सर्वसाधारपणे सीमा निश्चित केलेला असा होतो.

फळे, फुले, वस्तु, सृष्टी आणि सौंदर्य यांच्याशी सबंधित गावांची नावे सुध्दा महाराष्ट्रात दिसून येते. जसे हळदी, भाकरी, लवंग, मसाला, वरफगाव, लोणी, चांदणी, चांदसुरज, जुचंद्र, रोहिणी, किशोर, कुसुमधरा, केसरी, मंगलपेठ, स्वरुपखेड, कमलापूर, कनेरी, मोगरा यावरुन स्पष्ट होते.

नियोजन व विकासाची कामे करताना प्रशासनाला गावांशी दैनंदिन संबंध ठेवावा लागतो. त्यामुळे महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर गावांच्या जनगणनेचे काम हाती घेण्यात आले होते. हे जिकरीचे काम त्यावेळी अत्यंत चिकाटीने पूर्ण करण्यात आले. म्हणूनच आपल्याला आज खेडयांच्या नावांची वैविध्यपूर्ण माहिती कळू शकली.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद