पारंपरिकतेसोबतच व्यावसायिक शेतीकामात मजुरांच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या उपलब्धतेच्या या समस्येचे समाधान काही अंशी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच हा एक पुढील टप्पा बनू शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
कापूस शेतीसोबतच फळबागांसारखे क्षेत्र यांत्रिकीकरणापासून आजही वंचित राहिले आहे, याची दखल घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांतर्गत येणाऱ्या कृषी शक्ती व अवजार विभागातील सहायक प्राध्यापिका मृदुलता देशमुख यांनी लिंबूवर्गीय फळपिकांच्या तोडणीसाठी उपयोगी पडणारे यंत्र विकसित केले आहे.
संत्रा व लिंबू तोडणीसाठी अशी स्वतंत्र दोन यंत्रे विकसित करण्यात आली असून राहुरी कृषी विद्यापीठात झालेल्या संयुक्त संशोधन परिषदेच्या बैठकीत या यंत्राच्या प्रसाराला मान्यता मिळाली आहे. पी.व्ही.सी. पाईपपासून तयार करण्यात आलेल्या या यंत्राचे वजन अवघे १.४ किलोग्रॅम आहे. पाइपच्या वरच्या बाजूला एक कात्री देण्यात आली असून, तिच्या सहाय्याने फळ तोडले जाते. या कात्रीच्या नियंत्रणासाठी वाहनाच्या क्लचचा वापर करण्यात आला आहे. क्लचची तार कात्रीला जोडण्यात आली असून क्लच दाबल्यानंतर कात्रीच्या साह्याने फळ तोडले जाते व पोकळ प्लास्टिक पाइपमधून घरंगळत पाइपच्या टोकावर असलेल्या नेटममध्ये पडते. अशी साधी सोपी सुटसुटीत रचना या अवजाराची आहे.
लिंबू फळपीक तोडणीकरिता वापरण्यात येणाऱ्या यंत्राची उंची दोन मीटर तर संत्र्याकरिता वापरात येणाऱ्या अवजाराची उंची एक मीटरपेक्षा कमी आहे. त्यासोबतच गरजेनुरुप पाइपची उंची कमी जास्त करण्याची सोय यामध्ये असल्याचे मृदुलता देशमुख यांनी सांगितले. लिंबू तोडणीसाठी उपयोगी पडणाऱ्या यंत्राकरिता ३७६ रुपये तर संत्रा तोडणी यंत्राकरिता ३४४ रुपये खर्च अपेक्षित आहे. लिंबू तोडणी यंत्राची क्षमता १५.६ किलो प्रती तास तर संत्रा यंत्राची क्षमता ५९ किलो प्रती तास आहे. या माध्यमातून फळपिकाच्या तोडणीतील श्रम निश्चित कमी होतील, असा विश्वास श्रीमती देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment