अमानीतील पंरपरागत गोडंबी उद्योग,त्यापासन झालेली रोजगार निर्मिती व मिळणारे उत्पन्न अशी सर्वांग माहिती मिळविण्यासाठी गोंधळवाडी येथील रामदास गोदमले यांनी पुढाकार घेतला.बिब्बा उद्योगाशी संबंधित माहिती घेतल्यानंतर कोरडवाहू शेतीला या गोडंबी उद्योगाची जोड दिल्यास निश्चितच उत्पन्नात भर पडेल आर्थिक स्थैर्य लाभेल असा विश्वास या गावातील रामदास गोदमले यांना आला. त्यानंतर त्यांनी अमानीतील या उद्योगाकरिता लागणा-या कच्चा मालाचे पुरवठादारांशी संपर्क साधत त्यांच्याशी व्यावसायिक बोलणी केली. गेल्या चार वर्षापासून गोंधळवाडीतील बहुतांश घरात बिब्बे फोडून गोडंबी उत्पादन घेतले जाते.
पातूर तालुक्यातील गोंधळवाडीसह काही आदिवासी पाडयांमध्ये हिवाळा आणि उन्हाळयात बिब्बे फोडून गोडंबी मिळविण्याचा उद्योग सुरु असतो. याबाबत माहिती देताना रामदास गोदमले म्हणाले की,उद्योगाकरिता लागणारा बिब्बा आंध्र प्रदेशातील हैदराबाद,मध्य प्रदेशातील छिंदवाडा त्यासोबतच ओरिसा राज्यातील बहिरामपूर येथून खरेदी करण्यात येतो. गोंधळवाडी येथे तब्बल २५ कुटुंबे या उद्योगाशी जुळलेली आहेत. गावातील अनेकांसाठी हा उद्योग रोजगारप्राप्तीचे साधनही ठरला आहे. सहा महिन्यांच्या हंगामात २०० टन बिब्बे फोडून गोडंबी उत्पादन केले जाते.त्याकरिता लागणा-या कच्चा मालाची अर्थात बिब्यांची खरेदी ११ हजार रुपये प्रति टन याप्रमाणे होते.सरासरी एक क्विंटल बिब्यापासून सात किलो गोडंबी मिळते.स्थानिक बाजारपेठेत उत्पादित गोडंबीची २३०-२५० रुपये किलो प्रमाणे विक्री होते. गोडंबीचा वापर मसाला पदार्थामध्ये केला जातो.गोडंबीला अकोला,औरंगाबाद जिल्हयांमध्ये चांगली मागणी असते.
आदिवासी पाडयांमध्ये सध्यातरी बिब्बे पारंपारिक पध्दतीने फोडले जातात. बिब्बे फोडतेवेळी सुरक्षाविषयक आधुनिक साधनांची उपलब्धता नसल्याने प्लॉस्टिक पिशवीपासून घरीच तयार केलेले हातमोजे घातले जातात.बिब्यांपासून निघणारे तेल हातावर पडून इजा होण्याची शक्यता असते. त्यासोबतच बिब्याच्या तेलाचा काही वेळा ञास होतो. त्यामुळे या उद्योगात जोखीम मोठी आहे. बिब्बे फोडण्याच्या कामामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. गोडंबीच्या उत्पादनावर मजुरी ठरते.या उद्योगातील धोके कमी करण्यासाठी गावकरी आता बिब्बे फोडणी यंञाचा वापर करणार आहेत.
गोडंबी उद्योगातील रोजगाराची संधी बघता कृषी विभागाने या व्यवसायाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे,तसेच पातूर तालुका कृषी अधिकारी ए.के.पडघन,श्री कोकणे,कृषी सहायक जी.टी.उगले यांनी या भागातील बिब्बा प्रक्रिया करणा-या लोकांना बिब्बे फोडण्यासाठी अनुदानावर वाशीम जिल्हयातील करडा कृषी विज्ञान केंद्रामार्फत हे यंञ या संघाला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कृषी व्यवस्थापन व तंञज्ञान संस्था या सदराखाली बिब्बा उद्योगाच्या यांञिकीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे.त्या अंतर्गत पहिल्या टप्यात गोंधळवाडी येथील २५ गोडंबी उत्पादकांचा संघ स्थापन करण्यात येणार आहे .
मुंगसाजी माऊली नावाने स्थापन होणा-या या गटाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.बिब्बा फोडणीसाठी परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाने यंञ विकसित केले आहे. यंञाच्या वापराने बिब्बा फोडणीमधील जोखीम कमी होईल. त्यासोबतच गोडंबी उत्पादकांना विक्री व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.उत्पादित गोडंबी पॅकिंग करुन बाजारात गोडंबी उत्पादक संघाच्या ब्रॅण्डनेम ने विकण्यात येणार आहे. त्यामुळे बिब्बे उत्पादकांना चार पैसे जादा मिळणार आहेत. या उद्योगाच्या माध्यमातून गोंधळवाडी गावातील शेतीपूरक उद्योगाच्या कक्षा विस्तारण्यास निश्चितच मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment