Wednesday, October 26, 2011

सेंद्रिय शुद्धता


राज्य शासनातर्फे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत सेंद्रिय शेती आणि त्यासाठी लागणाऱ्या खतनिर्मिती युनिटबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पालगड गावातील कोंडविलकर कुटुंबाने चांगला गांडुळखत प्रकल्प उभारून शासनाच्या या प्रयत्नांना प्रतिसाद दिला आहे.

पुष्पा कोंडविलकर यांचेकडे पारंपरिक फळबाग आणि भाताची शेती होत असे. शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर करण्यात येई. सेंद्रिय खताविषयी अधिक माहिती घेतल्यावर बाहेरून किंमत मोजून खत आणण्याऐवजी आपल्याच शेतात सेंद्रिय खताचे युनिट उभारण्याचे त्यांनी निश्चित केले. २००५ मध्ये श्री समर्थ गांडूळ खत प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. कोंडविलकर गुरुजींनी निवृत्तीनंतर या युनिटकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. प्रकल्पाची गुणवत्ता चांगली असली तर भूमीपुत्राचे ऋण फेडण्यासाठी खत प्रकल्पाच्या माध्यमातून चांगली संधी मिळेल म्हणून त्यांनी या प्रकल्पाचा सूक्ष्म अभ्यास केला.

गांडूळ सतत परिश्रम करणारा प्राणी आहे. त्याच्या सहवासाने कष्ट करण्याची प्रेरणा मिळते, असे गुरुजी नम्रपणे सांगतात. 'आपण कोणाचे मित्र सहजपणे होत नाही' असे सांगताना ते गांडुळाचे कार्य स्पष्ट करून सांगतात. कोंडविलकरांनी प्रारंभी तिसंगी येथून पाच हजार रुपयांचे १० किलो गांडूळ आणले. गांडुळांची देखभाल व्यवस्थित करण्यासाठी कचऱ्याचे बेड तयार करण्यात आले. त्यासाठी हत्ती गवत शेतातच लावण्यात आले. गवताची गुणवत्ता चांगली असण्यासाठी शेणखताची गुणवत्ता चांगली असणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात पाणी शोषले गेल्याने आणि पावसाळ्यात पाण्याद्वारे सर्व जैविक घटक वाहून गेल्याने बाहेरून मिळणारे शेण गवतासाठी फारसे पोषक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेणासाठी त्यांनी सहा गायी खरेदी केल्या. गाईंची संख्या आता १९ पर्यंत पोहोचली आहे.

गाईचे शेण मिळाल्यावर त्यातील गुणवत्ता कायम रहावी म्हणून शेतातच शेडमध्ये टाक्यांची बांधणी केली आहे. त्यामुळे पावसाळ्यातही शेणातील पौष्टिक तत्त्व कायम राहतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने गवताच्या डेपोवर गांडूळ सोडले जातात. ते गवत खाऊन खालच्या भागात जाताना खताची निर्मिती करतात. अत्यंत शुद्ध असलेले सेंद्रिय खत त्याद्वारे मिळते. शेतातल्या गड्याने खताचे कौतुक सांगताना चहापेक्षाही चांगले पाण्यात विरघळते, असे सांगत प्रात्यक्षिक करून दाखविले.

कोंडविलकर गुरुजींच्या शेतातील प्रकल्पात एक लाख रुपये किंमतीचे सुमारे ५०० किलो गांडूळ तयार झाले आहेत. दीडशे बाय एकशे तीस फुटाच्या शेडमध्ये त्यांचे युनिट यशस्वीपणे सुरू आहे. गोठ्यातील गाईंचे शेण, मूत्र, दूध आदी सर्व बाबींचा पुरेपूर उपयोग व्यवसाय आणि प्रकल्पासाठी करण्यात येत आहे. गोमूत्राचा वापर हत्ती गवतावर फवारणीसाठी केला जातो. स्थानिक बाजारात ४०० ते ५०० रुपये टन दराने गांडूळ खताची विक्री होत आहे. दररोज गाईचे ७० लिटर दूध बाजारात विक्रीसाठी जाते.

सेंद्रिय शेतीमुळे एकीकडे शेतातील उत्पन्न वाढत असताना जमिनीचा कसही वाढतो आहे. शिवाय या प्रकल्पामुळे शेताची गरज पूर्ण होऊन शिवाय खत विक्रीतून उत्पन्नात वाढदेखील झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प अभ्यासाचा विषय बनला आहे. खताची गुणवत्ता चांगली असल्याने कृषि विद्यापीठाचे प्राध्यापक-विद्यार्थी प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी येत असतात. शेतातील अशा लहान प्रकल्पातून कृषि व्यवसायाला मिळणारी दिशा महत्त्वाची असते, हेच या प्रकल्पाने सिद्ध केले आहे.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद