वाढती लोकसंख्या आणि कमी होणारे शेतीक्षेत्र ही चिंतेची बाब असून त्यावर मात करण्यासाठी सिंचन क्षेत्र व उत्पादकता वाढवून दुसरी हरित क्रांती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कृषी व पणन विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित शेतकरी गौरव समारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री गणपतराव देशमुख, गोविंदराव आदिक, रणजित देशमुख, बी.जे.खताळ, शंकरराव कोल्हे, नानाभाऊ एंबडवार, अनंतराव थोपटे, हर्षवर्धन देशमुख, आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो, कृषी विभागाने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी मंत्री, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, संशोधक, कृषी क्षेत्रात विविध पुरस्कार मिळणारे शेतकरी आणि अधिकारी यांचा गौरव केल्याबद्दल कृषी विभागाचे अभिनंदन करुन मुख्यमंत्री म्हणाले, १९६० च्या दशकात विशिष्ट राज्य व विशिष्ट पिकांमध्ये हरित क्रांती झाली होती. सध्याच्या परिस्थितीत दिवसेंदिवस शेती क्षेत्र कमी-कमी होत आहे. त्यामानाने ओलिताचे क्षेत्र म्हणावे तसे वाढलेले नाही. पंजाब, हरियाणा राज्याच्या तुलनेत आपले सिंचनक्षेत्र अत्यंत कमी आहे. त्यासाठी कोरडवाहू क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून संशोधन व पाण्याचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. नवीन बियाणे, जैवतंत्रज्ञानावर आधारित असावे. शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यावी जेणेकरुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. नवनवे संशोधन व आधुनिक अवजारे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचली पाहिजेत. यावर्षी कापूस व ऊसाचे उत्पादन वाढले आहे. त्यांच्या मालाला चांगले भाव मिळण्यासाठी निर्यातीची गरज आहे.
शेतीवर येणारे नैसर्गिक संकट, हवामानातील बदल, पावसाची अनियमितता याचा उहापोह करताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना बँकामार्फत यावर्षी २३ हजार कोटी रुपयांचा पतपुरवठा केला असल्याचे सांगितले. नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकऱ्यांनी काम करण्याची आवश्यकता असून शेतकऱ्याच्या हितासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतकरी हा देशाच्या विकासातील आर्थिक कणा असून त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ कृषीतज्ञ खा.डॉ.एम.एस.स्वामीनाथन आपल्या अध्यक्षीय भाषणात स्व.वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन म्हणाले, शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत ज्ञान पोहचविण्याची आवश्यकता आहे. कृषी क्षेत्रांसमोर आव्हान असले तरी आपल्या देशातील तरुणांची संख्या ५० टक्के आहे. ही जमेची बाजू म्हणावे लागेल. या वर्गाला कृषी क्षेत्राकडे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आकर्षित करुन घेण्याची गरज आहे. शेतीतील गुणवत्ता टिकविण्यासाठी त्यांना सेवा उपलब्ध करुन द्यावी आणि शेती क्षेत्रात महिला वर्गाचे वाढते प्रमाण पाहता त्यांना अधिक प्रोत्साहन द्यावे.
स्व.वसंतराव नाईक यांच्या स्मृतीला अभिवादन करुन अजित पवार म्हणाले, शेत मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यावर उपाय म्हणून आधुनिक शेत अवजारे व पूरक व्यवसायाची जोड दिल्याशिवाय पर्याय नाही. ऊसाचे व कापसाचे उत्पादन वाढले आहे. उत्पादन वाढले व भाव कमी मिळाले तर शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी नवनवे संशोधन करुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, कृषी विद्यापीठांना दरवर्षी निधी उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक भाषणात कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकरी गौरव समारंभामागील पार्श्वभूमी सांगताना सुवर्ण महोत्सवी वर्षात राजच्या कृषी विकासात योगदान देणाऱ्या शेतकरी संशोधन कृषी विद्यापीठाचे कुलगुरु माजी मंत्री यांचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे. कृषीरत्न, कृषी भूषण, जिजामाता कृषीभूषण सेंद्रिय शेती, शेती निष्ठ, शेती मित्र व विज्ञान पंडित अशा १४२६ शेतकऱ्यांचा कृतज्ञतेच्या भावनेतून गौरव करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात शेतीचे आधुनिक अवजारे उपलब्ध होती.
उपस्थितांचे आभार कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी आभार मानले. डॉ.स्वामीनाथन यांच्या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद कृषी विभागाचे प्रधान सचिव डॉ.सुधीरकुमार गोयल यांनी केला.
No comments:
Post a Comment