भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या देशातील बहुतांश म्हणजे जवळ जवळ ६० ते ७० टक्क्यांहून जास्त लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. बलशाली भारताला सुजलाम-सुफलाम बनविण्यास बळीराजा जबाबदार आहे. मात्र सध्याच्या गतिमान काळात वेगवेगळी रासायनिक खते वापरुन झटपट पैसे मिळविण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे याचा जमिनीवर तर परिणाम होतोच, शिवाय रासायनिक खतातील कार्बन डायऑक्साईड, पोटॅशिअम सारख्या विषारी घटकांमुळे अन्न द्रव्यामधून मानवाच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे रासायनिक शेती धोकादायक ठरत आहे. मात्र सध्याच्या गतिमान युगातही गांडूळ, सेंद्रिय खते, हिरवळीची खते वापरुन नैसर्गिक शेती फूलवत भरघोस उत्पन्न मिळविणारे पटवर्धन कुरोलीतील शेतकरी पोपट देवकर यांच्या सेंद्रिय शेतीची गोष्ट काही निराळीच आहे.
सेंद्रिय शेतीकडे कसे वळलो हा अनुभव सांगताना श्री. देवकर म्हणाले की, पूर्वी मी रासायनिक खतांचा जास्त प्रमाणावर वापर करत होतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी, सततचा रासायनिक खतांचा वापर यामुळे जमिनीचा पोत बिघडत चाललेला होता. अशा स्थितीत मला पांडूरंग सहकारी साखर कारखान्याकडून गांडूळ प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव आला व हा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडून २५ हजाराचे अनुदानही मिळाले. गांडूळखत
म्हणजे शेतकऱ्यांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. गांडूळ खतामुळे शेतकऱ्यांना ७० टक्के फायदा मिळतो. एका वर्षामध्ये जवळ जवळ ५ ते ४० टन इतके गांडूळ खत मिळते. या गांडूळ खतामुळे उत्पादनात वाढ तर होतेच शिवाय जमिनीचा पोतही चांगला सुधारतो, गांडूळ खताबरोबरच गोमूत्र, शेणखत, मूग डाळीचे पीठ व गूळ यांचे संयुक्त मिश्रण करुन ऊस पिकावर वापरल्याने चांगलाच फायदा होतो. माझा सेंद्रिय शेतीचा अनुभव वाढत गेल्याने याचे आकर्षण वाटू लागले.
खोडव्या उसाच्या पाचटापासून कंपोस्ट खत बनवता येते. उसाच्या पाचटापासूनही चांगल्या प्रकारे कंपोस्ट खत मिळते. त्यासाठी खोडवा, उसाचे पाचट न पेटवता ते जमिनीत गाडावे तसेच गांडूळ खताबरोबरच कंपोस्ट खताचा शेतात वापर केल्याने चांगले उत्पन्न मिळते. पिकाचे व्यवस्थित नियोजन करुन जोडीला गांडूळ खतासारखे प्रकल्प राबविले तर महागाईच्या काळातही शेतकरी प्रगती करु शकेल.
सेंद्रिय खतांचा वापर करुन आजपर्यंत उसामध्ये कलिंगड, मिरची यासारख्या नगदी पिकाचे भरघोस उत्पादन घेतल्याचा अनूभव सांगून, माझ्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही गांडूळ प्रकल्पाचा प्रयोग राबवावा, असे आवाहनही श्री. देवकर यांनी केले. कृषी अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच सेंद्रिय शेतीव्दारे वेगवेगळे यशस्वी प्रयोग करु शकलो, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
नैसर्गिक आपत्ती, पिकांना हमी भावाची कमतरता, वाढती महागाई या सर्व गोष्टींमुळे बळीराजाची अवस्था दयनीय झाली आहे. अशा परिस्थितीत पोपट देवकर यांच्या कमी खर्चाच्या व भरघोस उत्पन्न देणाऱ्या सेंद्रिय शेतीचा शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा.
शेतकरी राजा कशाला राहतो परावलंबी
आता सेंद्रिय शेती करुनि हो स्वावलंबी
हे ब्रीद अंगिकारल्यास तो जीवनात यशस्वी होईल हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही. गरज आहे ती शेतकऱ्यांच्या स्वच्छ दृष्टिकोनाची... आणि कष्टाची....
No comments:
Post a Comment