उस्मानाबाद जिल्हा तसा कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र साठवण तलाव, बंधारे यांच्या माध्यमातून सिंचनाचे प्रयत्न होत आहेत. त्याची फलनिष्पत्ती हळूहळू दिसायला लागली आहे. पाण्याचा योग्य उपयोग करुन काही ठिकाणी फुललेली शेती हे त्याचे बोलके उदाहरण आहे. कळंब तालुक्यातील शिरढोण गावच्या राजेंद्र मुंदडा या युवकाची कहाणीही अशीच आहे. कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कष्टाची तयारी आणि सतत वेगवेगळे प्रयोग करण्याची वृत्ती यामुळे फायदेशीर व नफ्याची शेती हा मंत्र राजेंद्र मुंदडा यांनी प्रत्यक्षात उतरवला आहे.
श्री. मुंदडा यांच्याकडे तशी मुबलक शेती आहे. याच शेतीत त्यांनी अनेकविध प्रयोग करुन आणि वेगवेगळी शेतपिके घेऊन भरघोस उत्पन्न कमावले आहे. शेतीत स्वत: राबून मिळालेले हे यश आहे, असे ते नम्रतापूर्वक सांगतात. आपल्याला कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. त्यामुळे कष्टाला पर्याय नाही, हे त्यांचे साधे सूत्र आहे. त्याच्या जोरावरच त्यांचे शेतीतील प्रयोग सुरु आहेत.
श्री. मुंदडा व त्यांच्या कुटुंबाकडे ५८ हेक्टर शेती आहे. तेथे त्यांनी ठिबक सिंचन व तुषार सिंचन पध्दतीने पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यातील ८० एकर क्षेत्रात सन २००३-०४ यावर्षी त्यांनी केशर जातीच्या आंब्याची लागवड केली. पूर्णपणे सेंद्रिय शेती पध्दतीने त्यांनी जमिनीची जोपासना केली असून त्यावरच या केशर आंब्याची लागवड केली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात राजेंद्र मुंदडा यांनी कृषी पणन महामंडळाच्या माध्यमातून जवळपास ५ टन आंबा अमेरिकेला पाठवला. विशेष म्हणजे त्यांच्या आंब्यास लातूर, नाशिक, पुणे, बीड, सोलापूर येथील बाजारपेठेतही चांगला प्रतिसाद मिळाला. शेतीतील अनेकविध प्रयोगांबद्दल त्यांना जिल्हा परिषदेनेही यावर्षी कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरविले आहे.
आत्मविश्वास, परिश्रम, जिद्द आणि सतत नवे शिकण्याची उर्मी यातूनच त्यांनी शेतीत नवनवे प्रयोग केले. कृषी विभाग, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनीही त्यांच्या शेताला भेट देऊन त्यांच्या जिद्दीचे आणि प्रयोगाचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे राजेंद्र मुंदडा यांनी आंब्याबरोबरच ३५ एकर क्षेत्रावर मोसंबीची लागवड केली आहे. मोसंबीच्या पिकामध्ये हरभऱ्याचे आंतरपीक त्यांनी घेतले आहे. यातून एकरी १५ क्विंटल एवढे उत्पन्न त्यांनी काढले आहे.
याशिवाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यांनी पशुधनाचीही जोपासना केली आहे. त्यांनी सध्या ७० जनावरे पाळली आहेत. त्यातूनच इंधनाची बचत करण्यासाठी त्यांनी बायोगॅस संयंत्र बसवले आहे. त्याचबरोबर शेतजमिनीला नैसर्गिक सेंद्रिय खतही उपलब्ध झाले आहे. कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रास सतत भेटी, कृषी शास्त्रांचे मार्गदर्शन यातून नवे शिकण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. हीच वृत्ती त्यांना यशाचे नवे नवे दालन खुले करुन देत आहे.
No comments:
Post a Comment