Tuesday, July 26, 2011

डोंगरगावचे आदिवासी झाले शेती तज्ज्ञ
आज विज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्याचे युग आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०१०-२०११ अंतर्गत शेतकरी शेती शाळेचे देसाईगंज तालुक्यातील मौजे डोंगरगाव हलबी येथे आयोजन करण्यात आले होते. डोंगरगाव हलबी या गावातील धान पिकावर कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होता. तसेच हा भाग आदिवासी असल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अंधश्रध्दा व पारंपरिक पध्दतीची प्रगतीमध्ये अडचण येत होती. कारण आदिवासी आपली पारंपरिक पध्दत सोडण्यास सहज तयार होत नाही. याकरिता येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबद्दल जनजागृती करण्यात आली.

गावातील शेतकऱ्यांना शेतीशाळेची माहिती देण्यासाठी सर्वप्रथम या गावात जाहीर दवंडी देऊन शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेतून इच्छुक व प्रगतीशिल ३० शेतकऱ्यांची शेतीशाळेकरिता निवड करण्यात आली. प्रत्येकी ६-६ शेतकऱ्यांचे ५ गट पाडण्यात आले. त्यांना मित्रकीटकांचे नाव देऊन प्रत्येक गटातून १ शेतकरी संपर्क शेतकरी म्हणून नेमण्यात आला. उपस्थित सर्व शेतकरी भात उत्पादक होते.


शेतीशाळेकरीता १० हेक्टर धान पिकाचे क्षेत्र आय. पी. एम. प्लॉट म्हणून व १० हे. क्षेत्र कंट्रोल प्लॉट म्हणून गावाच्या दक्षिणेस गावालगतच निवडण्यात आले. या क्षेत्रावर निरीक्षणे घेऊन शेतीशाळा राबविण्यात आली. त्याकरिता २० आठवड्यांचा आठवडी कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी श्री. वडसा यांचेकडून मागविण्यात आला. सर्व प्रथम गावात सभा घेऊन गावाची माहिती संकलित केली. त्यामध्ये गावाची लोकसंख्यास महिला व पुरुष संख्या, शेतकरी संख्या, गावाचा नकाशा, त्या गावातील भात पिकावरील क्षेत्र, कीड व रोगाबाबत समस्या व त्याच्या व्यवस्थापनासाठी वापरत असलेले उपाय व सिंचन सुविधा इत्यादी माहिती घेण्यात आली होती.

या ३० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता देसाईगंजचे मंडळ कृषी अधिकारी जी. ए. रामटेके यांनी काम पाहिले. प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शक म्हणून पी. जी. कोमटी, वाय. पी. रणदिवे, टि. एम. मेंद यांनी भात पिकासंदर्भातील आधुनिक माहिती दिली. या प्रशिक्षणामध्ये शेतीशाळेचे महत्त्व व उद्देश समजावून सांगण्यात आले. त्यानंतर भात-बियाणे निवड, बीज प्रक्रिया, भात रोपवाटिका तयार करण्यापासून ते भाताची कापणी, साठवणूक होईपर्यंतचे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणातून शेतीचे प्रमुख उद्देश- निरोगी व सशक्त पिक जोपासना, किडीच्या नैसर्गिक शत्रूचे संवर्धन करणे, नियमितपणे निरीक्षण करणे. शेतकऱ्यांना एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये तज्ज्ञ बनविणे याचे शास्त्रोक्त पध्दतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

शेतकऱ्यांना या प्रशिक्षणामध्ये लष्कर अंडी, पाने गुंडाळणारी अंडी, खोडकिडा व तुटतुटे अणि करपा, कडाकरपा, काजळी या कीड व रोग इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या पाच गटांकडून ड्राँईंग पेपरवर किड्यांचे चित्र काढून घेण्यात आले. त्यामुळे या किडीची ओळख शेतकऱ्यांच्या स्मरणात राहिली. तसेच त्यांच्या नियंत्रणाकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने उपाययोजना कशी करावी याचे तांत्रिक मार्गदर्शन कृषी सहाय्यक व गट प्रमुख यांच्यामार्फत देण्यात आले. तसेच एकात्मिक खत व्यवस्थापन, एकात्मिक पाणी व्यवस्थापनाचे शिक्षण देखील या शेतीशाळेत देण्यात आले.

धान पिकांच्या सर्व हंगामात व पिकांच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेतील, लागवडीपासून ते काढणीपर्यंत, धानाचे वाढीमध्ये कोणते बदल होतात, किडीची अवस्था कशी असते याचे शेतीशाळेतील सात दिवसांत निरीक्षण घेण्यात आले. तसेच पिकांच्या शत्रू किडी व मित्र किटक यांची ओळख सुध्दा प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना समजावून देण्यात आली. संपूर्ण शेतीशाळेत प्रत्यक्षात रोग अणि किडी, शेतकऱ्यांना दाखवित असल्यामुळे व त्यांचे उपाय सांगीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे दुसऱ्या वर्गास पिकामध्ये काय बदल होतात व त्याची आपणास काय माहिती मिळते याबाबत शेतकरी विचारणा करीत होते. शेतकरी नियमितपणे कीड व रोग याबाबत सुध्दा क्षेत्रीय कर्मचारी व प्रशिक्षण देणाऱ्या टिमशी चर्चा करीत होते.

जे शेतकरी शेतीशाळेत हजर राहत होते, ते गावातील इतरही शेतकऱ्यांना शेतीशाळेत मिळालेली माहिती समजावून सांगत होते. कृषि संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार संपूर्ण गावामध्ये कसा करता येईल यासाठीसुध्दा प्रशिक्षक टिमकडुन प्रात्याक्षिक करण्यात येत होते. त्यामुळे गावातील इतर शेतकरीसुध्दा या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करु लागले.

या शेतीशाळेमुळे गावातच तज्ज्ञ शेतकरी तयार होऊन इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करु लागल्यामुळे त्या गावाची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद