Tuesday, July 5, 2011

‘विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी’
मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे विस्‍तार कार्यासाठी मर्यादित मनुष्‍यबळ आहे. तथापि नवनियुक्‍त कुलगुरु डॉ. के.पी. गोरे यांनी सर्व सहका-यांना प्रेरणा देऊन ‘विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी’ हा अभिनव उपक्रम राबविला.

या उपक्रमामुळे विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांनी गावा-गावात जाऊन प्रत्‍यक्ष शेतक-यांशी संवाद साधला. असा अनोखा उपक्रम राबविणारे मराठवाडा कृषी विद्यापीठ राज्‍यातील एकमेव कृषी विद्यापीठ ठरले आहे.

परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठ विविध माध्‍यमातून शेतक-यांपर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार व्‍हावा म्‍हणून प्रयत्‍न करीत असते.
विद्यापीठाकडून कृषी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि विस्‍ताराचे कार्य केले जाते. विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांमार्फत कृषी विभागातील विस्‍तार कार्यकर्त्‍यांच्‍या मदतीने कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार केला जातो. हे विस्‍तार कार्यकर्ते ग्रामीण भागापर्यंत व शेतक-यांपर्यंत विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोहोचवतात. विद्यापीठाकडे विस्‍तार कार्यासाठी मर्यादित मनुष्‍यबळ आहे.कृषी विभागाच्‍या व इतर संबंधित विभागाच्‍या विस्‍तार कार्यकर्त्‍यांना प्रशिक्षण देण्‍यासाठी त्‍यांचा वापर होतो.

नवनियुक्‍त कुलगुरु डॉ. के.पी. गोरे यांनी पदभार स्‍वीकारल्‍यापासून विद्यापीठ ख-या अर्थाने ‘लोकाभिमुख’ करण्‍याचा प्रयत्‍न केला. विद्यापीठाच्‍या विविध विभागांची पत्रकारांना ओळख व्‍हावी, यासाठी पत्रकारभेटीचे आयोजन केले.यामुळे विविध विभागात चालणा-या प्रत्‍यक्ष कार्याची पहाणी करण्‍याची संधी पत्रकारांना मिळाली.


ऐकीव किंवा छापील प्रसिध्‍दीपत्रकाद्वारे बातमी छापण्‍यापेक्षा थेट भेटीमुळे विद्यापीठाची खरी ओळख पत्रकारांना झाली.

पत्रकारांच्‍या मनात असणा-या विविध शंका-प्रश्‍नांना वस्‍तुनिष्‍ठ उत्‍तरे मिळाल्‍यामुळे कुलगुरु आणि विद्यापीठाची प्रतिमा उज्‍ज्‍वल होण्‍यास मदतच झाली.पत्रकार नेहमी ‘नकारात्‍मक’च छापतात हा चुकीचा समजही या पत्रकारभेटीमुळे दूर झाला.

कृषी तंत्रज्ञान प्रसार पाहिजे त्‍या प्रमाणात करण्‍यात कृषी विद्यापीठ तसेच कृषी विभाग कमी पडत असल्‍याची टीका होते. तथापि, मराठवाडा कृषी विद्यापीठाने विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषी विभागाच्‍या सहकार्याने ‘विद्यापीठ आपल्‍या दारी :तंत्रज्ञान शेतावरी’ हा उपक्रम राबवला.

या उपक्रमाचे उद्घाटन विद्यापीठ वर्धापन दिनी म्‍हणजे १८ मे रोजी झाले.भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उप महासंचालक डॉ. ए. के. सिंग, राष्‍ट्रीय ज्‍वार संशोधन संचालनालयाचे (हैद्राबाद) संचालक डॉ. जे.व्‍ही. पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. रावसाहेब चोले, संशोधन संचालक डॉ. जी.आर. मोरे, शिक्षण संचालक डॉ. व्‍ही. एस. शिंदे आदींची प्रमुख उपस्‍थिती होती.

‘तंत्रज्ञान शेतावरी’ हा उपक्रम परभणी आणि हिंगोली जिल्‍ह्यातील निवडक ५६ गावांमध्‍ये राबविण्‍यात आला.

त्‍यामध्‍ये परभणी जिल्‍ह्यातील धोंडी, माळसोन्‍ना, पोखर्णी (बु), धसाडी, मानवत तालुक्‍यातील किन्‍होळा, नागरजवळा, खडकवाडी, बोंदरवाडी, पाथरी तालुक्‍यातील बोरगव्‍हाण, रेणाखडी, झरी, देवेगाव, गंगाखेड तालुक्‍यातील सेहमोहा, बडवणी, कड्याची वाडी, तांदूळवाडी, सेलू तालुक्‍यातील राजवाडी, रोहीणा, वालूर, कन्‍हेरवाडी, ब्राम्‍हणगाव, कवडधन, डुगरा, कान्‍हड, जिंतूर तालुक्‍यातील अंबरवाडी, बामणी, सावंगी, दहेगाव, भोसा, पूर्णा तालुक्‍यातील निळा, कंठेश्‍वर, कळगाव, भाटेगाव, पालम तालुक्‍यातील पोखर्णा देवी, चोरवड, उमरा, मार्तंडवाडी, वरखेड, बंदरवाडी आणि सोनपेठ तालुक्‍यातील करम, वैतागवाडी, विळा, वडगाव यांचा समावेश होता.

हिंगोली जिल्‍ह्यातील वसमत तालुक्‍यातील कौठा, माहेगाव, गोराळा, दाभाडी, सेनगाव तालुक्‍यातील वरुड चक्रपाणी, आडोळा, म्‍हाळसापूर, खिल्‍लार, औंढा तालुक्‍यातील गोजेगाव, अनखडळी, सावळी (बु), पोटा (बु), कळमनुरी तालुक्‍यातील सेलसुरा, शिवणी (खु) उमरा टाकळगव्‍हाण आणि हिंगोली तालुक्‍यातील खेर्डा, फाळेगाव, पातोंडा, मोप या गावांचा समावेश होता. त्‍यासाठी विस्‍तृत कृती आराखडा तयार करण्‍यात आला होता.

दोन्‍ही जिल्‍ह्यांसाठी शास्‍त्रज्ञांचे पाच चमू करण्‍यात आले.या चमूमध्‍ये कृषी विद्या, मृद विज्ञान, उद्यान विद्या, तणविज्ञान, कृषी अभियांत्रिकी, कृषी किटकशास्‍त्र व वनस्‍पती विकृतीशास्‍त्र पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र यातील विषयतज्ञांचा समावेश करण्‍यात आला होता.

डॉ. आर.एम. कुलकर्णी, प्रा.ए.के. गोरे, डॉ. डी.जी. मोरे, प्रा. आर.एन. खंदारे, डॉ. जी.पी. जगताप, डॉ. ए. टी. शिंदे, प्रा. पी. ए. मुंढे, डॉ. प्रवीण कापसे, यु.पी. वाईकर, डॉ. के.टी. जाधव, प्रा.बी.व्‍ही. भेदे, डॉ. जी.आर. हानवते, डॉ. डी.एम. नाईक, डॉ. व्‍ही. एम. घोळवे, प्रा. एम.आर. मोरे, डॉ. ए.एस.जाधव, डॉ. प्रशांत भोसले, डॉ. व्‍ही.एस. मनवर, डॉ. डी.जी.डावरे, डॉ.डी.एस.किडे, प्रा. एस.जे. शिंदे, डॉ. एस.एल.बडगुजर, डॉ. ए.एन. कुलकर्णी, डॉ. पी.के.वाघमारे, डॉ. यू.एन.आळसे, प्रा.डी.आर. कदम, प्रा. पी.बी. अडसूल, डॉ. एस.डी. जेठुरे, डॉ.के.डी. नवगिरे, प्रा. श्रीमती एस.यू. पवार, प्रा.जी.डी. गडदे, डी.डी. पटाईत, डॉ. एम.एस. देशमुख, प्रा. जी.आय.इंगळे, प्रा. व्‍ही.जी.मुळेकर, प्रा. एम.आर. मोरे, या शास्‍त्रज्ञांचा सहभाग होता.

खरीप हंगामासाठी आवश्‍यक असणारे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविणे, कडधान्‍य व तेलबिया पिकांच्‍या उत्‍पादन तंत्रज्ञानाच्‍या प्रसारावर भर देणे,त्‍यांचे तातडीचे प्रश्‍न आणि शंकांचे समाधान करणे, त्‍यांच्‍यांमध्‍ये उमेदनिर्मिती करणे ही प्रमुख उदि्दष्‍टे डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबवण्‍यात आला.

पूर्वनिश्‍चित गावात ठरलेल्‍या दिवशी त्‍या-त्‍या शास्‍त्रज्ञांचा चमू जायचा.पूर्वप्रसिध्‍दी झालेली असल्‍याने गावकरी गोळा व्‍हायचे.कोणतीही औपचारिकता न पाळता शेतक-यांच्‍या प्रश्‍नांना उत्‍तरे दिली जायची.

माती परीक्षण, मशागत, लागवड, तंत्रज्ञान, अन्‍नद्रव्‍ये व पाणी व्‍यवस्‍थापन, मृद व जलसंधारण, पीक संरक्षण, कृषी अवजारे, पशुसंवर्धन, दुग्‍धशास्‍त्र अशा विविध विषयावर शेतक-यांना माहिती देण्‍यात आली.

कृषी विभागाच्‍या योजना आणि विद्यापीठाचे उपक्रम कृषी क्षेत्रातील शेवटच्‍या घटकांपर्यंत पोहोचवण्‍यात त्‍यामुळेच यश आले.

परभणी व हिंगोली जिल्‍ह्यातील कृषी विभागाच्‍या अधिका-यांसह विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. रावसाहेब चोले, कृषी तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. आनंद गोरे, डॉ. आर.एम. कुलकर्णी, डॉ. ए. एस. जाधव, डॉ. के.टी. जाधव, डॉ. यू एन. आळसे, प्रा.जी.डी. गडदे, डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. प्रवीण कापसे, डॉ. प्रशांत भोसले व त्‍यांच्‍या सहका-यांच्‍या मदतीने हा उपक्रम यशस्‍वी झाला.

शेतक-यांनी काळाची गरज ओळखून नवनवीन तंत्रज्ञान, बियाणे वापरुन शेती करावी, जोडधंदयाचा अवलंब करुन आर्थिक स्‍थिती सुधारावी, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली जाते. कोणताही नवीन प्रयोग हा फायदयाचा आहे, हे पटेपर्यंत तो आपल्‍या शेतात करण्‍यास शेतकरी धजावत नाही, ही वस्‍तुस्‍थिती आहे.

मराठवाड्यातील शेती समृध्‍द व्‍हावी तसेच शेतक-यांवर तंत्रज्ञान न लादता त्‍यांच्‍या नेमक्‍या समस्‍या काय आहेत हे शास्‍त्रज्ञांना कळावे.कृषी क्षेत्रातील संशोधन नेमक्‍या कोणत्‍या दिशेने जायला हवे, याची जाणीवसुध्‍दा या उपक्रमाद्वारे झाली.

‘विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी’ हा अनुकरणीय व पथदर्शी कार्यक्रम राबविल्‍यामुळे मराठवाडा कृषी विद्यापीठ लोकाभिमुख झाल्‍याचे जाणवत आहे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद