स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत स्थापन झालेल्या बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी तज्ज्ञ बाजारपेठ संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
मंत्रालयात मंगळवारी यासंबंधीचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव सुधीर ठाकरे यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना स्वयंसहाय्यता बचतगटांच्या माध्यमातून संघटित करून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगून श्री.पाटील म्हणाले की, ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राज्याच्या ३३ जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये एप्रिल २०११ पर्यंत २ लाख ५५ हजार ३२४ बचतगट स्थापन झाले असून त्यामध्ये २ लाख ११ हजार ६२५ बचतगट महिलांचे आहेत. ८० हजार ६४२ बचतगटांनी स्वत:चे उत्पादन सुरु केले असून त्यामध्ये महिला बचतगटांची संख्या ७१ हजार ७१३ इतकी आहे. बचतगटांच्या माध्यमातून हे लघु आणि अति लघु उद्योजक नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार स्वरूपाची उत्पादने निर्माण करतात. त्यांच्या उत्पादनांना व्यापक आणि खात्रीशीर बाजारपेठ मिळावी, यासाठी त्यांना आवश्यक असलेली कौशल्ये संपादित करता यावीत या उद्देशाने शासनाने तज्ज्ञ बाजारपेठ संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र शासनाच्या सहकार्याने मुंबईत महालक्ष्मी सरस या बचतगटांच्या वस्तुंचे प्रदर्शन भरविण्यात येते. याप्रमाणेच राज्य शासन ३३ जिल्ह्यात आणि ६ महसुली विभागात अशा वस्तुंच्या विक्री प्रदर्शनाचे आयोजन करते. विभागीय प्रदर्शनासाठी २५ लाख तर जिल्हा प्रदर्शनासाठी १० लाख रुपयांपर्यंतचा निधी राज्य शासनामार्फत देण्यात येतो. तज्ज्ञ बाजारपेठ संस्थांकडून बचतगटांच्या उत्पादनांची विक्री व्यवस्था निर्माण केल्यास बचतगटांना व्यापक आणि शाश्वत बाजारपेठ मिळतांनाच त्यांच्या आर्थिक उत्पन्नात देखील वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment